Breaking News

शिवनेरी पाठोपाठ पुणे-नाशिक मार्गावरील हिरकणी सेवाही बंद

पुणे, दि. 07, नोव्हेंबर - पुणे-नाशिक मार्गावरील शिवनेरीपाठोपाठ हिरकणी सेवाही बंद करण्यात आली आहे. या मार्गावर नॉन एसी सेमी लक्झरी हिरकणीची थेट सेवा गेल्या अनेक  वर्षांपासून सुरू होती. मात्र आता या सर्व फेर्‍या बंद करण्यात आल्या आहेत. या मार्गावरील हिरकणी बस अन्य मार्गांवर वळविण्यात आल्याची माहिती एस. टी. प्रशासनाच्या वतीने  देण्यात आली.पुणे-नाशिक मार्गावरील शिवनेरीची सेवा 31 ऑक्टोबरपासून बंद करण्यात आली असून, हिरकणी व शिवनेरीच्या जागी 13 वातानुकूलित शिवशाहीच्या बस  दिवसभरात 38 फेर्‍या करणार आहेत. या गाडीचा तिकीट दर 346 रुपये आहे. हिरकणीच्या तिकिटापेक्षा शिवशाहीचे तिकीट अधिक आहे. हिरकणीचे तिकीट 308 रुपये होते.  दरम्यान, ज्यांना आरामदायी पण विनावातानुकूलित प्रवास करायचा आहे, अशांसाठी हिरकणीचा पर्याय चांगला होता. मात्र कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही सेवा बंद क रण्यात आल्याने प्रवाशांना बळजबरीने वातानुकूलित शिवशाहीने प्रवास करावा लागणार आहे. पुणे ते संगमनेर दरम्यान हिरकणीची सेवा मात्र या पुढेही सुरूच राहणार असल्याची मा हिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पुणे-नाशिक ही दोन्ही शहरे महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे या दोन्ही शहरातून ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या  मार्गावर शिवनेरी, हिरकणी, तसेच साध्या गाडीचा पर्याय प्रवाशांसमोर होता. त्यामुळेच प्रवाशांनाही परवडेल त्या बसने प्रवास करण्याचे स्वातंत्र्य होते. मात्र आता एस. टी. प्रशासनाने  शिवनेरी आणि हिरकणी गाड्या बंद केल्या आहेत. या दोन शहरांदरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांसमोर केवळ शिवशाही बसचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र हिरकणीपेक्षा या गाडीचे  तिकीट अधिक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र अधिकच्या तिकिटाची झळ बसणार असल्याची भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत.