प्रकाश, सुरावटीने न्हाऊन निघाला खांडेश्वरीचा परिसर, संस्कार भारतीच्या उपक्रमाने कलारसिक मंत्रमुग्ध
बीड, दि. 09, नोव्हेंबर - त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त बीडचे ऐतिहासिक वैभव असणा-या खंडेश्वरी परिसरातील दीपमाळाचा परीसर संस्कार भारतीच्या प्रकाश आणि सुरांच्या संगमाने नाहून निघाला. आकर्षक रोषणाईने लक्ष वेधून घेणा-या दिपमाळांच्या आसमंतात कलावंतांनी सूर आणि नृत्याची बहार उडवून दिली. बीड शहराची सांस्कृतिक ओळख असणा-या दिपमाळांच्या माळावर संस्कार भारती बीडच्या वतीने आयोजित दीपोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने झाली ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकरराव महाजन, संस्कार भारतीचे प्रांताध्यक्ष भरत लोळगे, शहराध्यक्ष प्रमोद वझे, संतोष पारगावकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक प्रमोद वझे यांनी केले.यानंतर पौर्णिमेच्या मंद प्रकाशात भरत लोळगे, वासवदत्ता हसेगावकर, सुनंदा जळगावकर, माधुरी थिगळे, कांचन पारगावकर यांनी आपल्या सुरांनी रंग भरले. आपल्या वैविध्यपूर्ण सादरीकरणात त्यांनी भक्तीगीत,नाट्यगीत, अभंग,सुगमसंगीत गाऊन उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर प्रकाश मानुरकर यांनी बहारदार साथ केली. यानंतर प्राजक्ता साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवी टाक णखार आणि राजन गायकवाड यांनी भरतनाट्यम प्रकारात नृत्य सादर केले तेव्हा रंगीत प्रकाशात झगमगलेल्या दिपमाळांचे सौंदर्य अधिकच खुलले.
