नोटा बंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा - दानवे
औरंगाबाद, दि. 09, नोव्हेंबर - नोटाबंदीमुळे देशात अनेक वर्षांपासून गैरमार्गाने अनेकांनी जमा केलेला व लपवून ठेवलेला काळा पैसा बँकांमध्ये आला. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी यांना आळा घालण्यासाठी उपयोग झाला असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केले. नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना यांचे आंदोलन होत असताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी नोटाबंदीचे समर्थन करण्यासाठी पत्रकार परिषद घेवुन माहिती दिली. भाजपतर्फे पोस्टर लावून समर्थन करण्यात आले आहे. माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी नोटाबंदीने भ्रष्टाचारावर आळा बसल्याचा दावा केला. काळ्या पैशावाल्याची या नोटबंदीने झोप उडाली आहे. तेच या नोटबंदीला विरोध करीत असल्याचे सांगत नोटबंदीचे समर्थन केले. नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचा दावा करीत भाजपने क्रांती चौक, निरालाबाजार, नुतन कॉलनी, हर्सुल, सिडको आदी भागात सरकारच्या अभिनंदनाचे पोस्टर्स लावले आहेत. नोटाबंदीने भ्रष्ट्राचाराला आळा बसला. काळा पैशावर नियंत्रण आले, यासह नोटाबंदीचे फायदे या पोस्टरद्वारे सांगण्यात आले आहेत.
