Breaking News

चहावाला ते पंतप्रधान हा मोदींचा प्रवास थक्क करणारा.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवांका ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबाद येथील जागतिक उद्योजकता परिषदेचे (जीईएस) उद्घाटन झाले. देशात पहिल्यांदाच होत असलेल्या या संमेलनात दीडशे राष्ट्रांचे जवळपास दीड हजार प्रतिनिधी सहभागी झाले. 


'वूमन फर्स्ट' या थीमवर आधारित या भव्य-दिव्य सोहळ्या वेळी इवांका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला शक्तीचे देशाच्या विकासातील महत्त्व यावर भाष्य केले. आपल्या भाषणात इवांका यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. 'साधा चहावाला ते भारतासारख्या महाकाय देशाचा पंतप्रधान हा मोदींचा प्रवास थक्क करणारा आहे, अशा शब्दात इवांका यांनी मोदींचे कौतुक केले. 

जगासाठी प्रेरणादायी असलेल्या या अर्थव्यवस्थेत महिलांना रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध व्हाव्यात. त्यामुळे येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला दीडशे अब्ज डॉलरचा नफा होईल, असे इवांका यांनी सांगितले. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इवांका यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी जगभरात भारताला एक देश म्हणून वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे, असे इवांका म्हणाल्या.