Breaking News

किरण भगत ठरला सह्याद्रि केसरीचा मानकरी

मसूर, दि. 2 (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या भव्य कुस्ती मैदानात माण  तालुक्यातील मोही गावच्या किरण भगत याने पंजाबच्या पुष्पेंद्र मलिकला एकेरी कस डावावर आस्मान दाखवत सह्याद्रि केसरी होण्याचा मान मिळवला. 
प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमपासून पंजाबच्या पुष्पेंद्र मलिकवर मोहीचा किरण भगत वरचढ ठरला होता. किरण भगत याने गर्दन पकड, पंजे की पकड करत कमरेत हात घालून  पटात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न मलिकने धुडकावून लावला. अटीतटीच्या झालेल्या लढतीत किरण भगतने एकेरी कस डावावर मलिकला चितपट करत प्रेक्षकांच्या  डोळ्यांचे पारणे फेडले. सुमारे 21 मिनिटे चाललेल्या या अंतिम कुस्तीत किरण भगत सह्याद्रि केसरीचा मानकरी ठरला. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी हिंदकेसरी दिनानाथसिंह यांनी  पंच म्हणून काम पाहिले.
प्रथम क्रमांकाची कुस्ती लढत सह्याद्रि कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लावली. यावेळी पंच दिनानाथ सिंह, समालोचक शंकर पुजारी कोथळीकर,  मानसिंगराव जगदाळे, संजय जगदाळे, पै. संजय थोरात, माणिकराव पाटील, कांतीलाल पाटील, जितेंद्र पवार, युवा नेते जशराज पाटील, सागर पाटील उपस्थित होते.
यावेळी प्रवीण मलिक (हरियाणा) व दादा शेळके (पुणे) यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये दादा शेळके याने मलिक वर मात केली. विजय धुमाळ (कोल्हापूर) विरूध्द गणेश जगताप  (पुणे) यामध्ये गणेश जगताप विजयी झाला. कोल्हापूरच्या समीर शेखवर कोपर्डे हवेलीच्या सागर साळवेने मात केली. प्रदीप भिसे (कोल्हापूर) विरूध्द शरद पवार (पारगाव)  यांच्यामध्ये शरद पवार याने भिसे याच्यावर मात केली. तर दादा मुलाणी विरूध्द संजय सूळ, रामदास पवार विरूध्द अविनाश पाटील या कुस्त्या बरोबरीत सोडविल्या. यावेळी बापू  कोळेकर, प्रकाश कोळेकर या बंधूंसह कन्हैया माने (कुंडल), पवन शिंदे (अंतवडी), नेताजी चव्हाण (कोपर्डे ह.), धीरज पवार (पिंपरी), नामदेव कोकाटे, अजय निकम यांनी चटक दार कुस्त्या करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.