Breaking News

मसूर-उंब्रजसह मसूर-किवळ रस्त्याचे खड्डे आंदोलकांनी श्रमदानाने भरले

मसूर, दि. 2 (प्रतिनिधी) : गेली वर्षभर व्हॉटस् अ‍ॅप व वृत्तपत्रातून चर्चेचा विषय ठरलेल्या आणि जनतेच्या तक्रारी असूनही आजवर दुर्लक्षित राहिलेल्या मसूर-उंब्रज व मसूर-किवळ  रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल अखेर संतप्त ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला शिव्यांची लाखोली वाहत स्वताच रस्त्यावरील डबरे भरून श्रमदान करीत अनोखे आंदोलन केले. रस्त्यांच्या  दुरावस्थेबद्दल संबंधित अधिकार्‍यांचा जाहीर निषेध करून एक महिन्यात दोन्ही रस्त्यांची दुरावस्था कायमस्वरूपी न मिटवल्यास निवेदन अथवा कोणतीही पूर्वसूचना न देताच  जेसीबीच्या साहाय्याने रस्ता केंव्हाही उखडून टाकला जाईल. पुढे होणार्‍या जनतेच्या गंभीर रोषास संबंधीत विभागाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी संतप्त आंदोलकांनी  दिला.
मसूर-उंब्रज व मसूर-किवळ रस्त्यांची गेल्या एक दोन वर्षापासून दुरावस्था झाली आहे. या रस्त्यांंची इतकी दयनीय अवस्था आहे कि खड्ड्यात रस्ता कि रस्त्यांत खड्ड्या अशी  अवस्था झाली आहे. जागोजागी मोठे खड्डेे, खडी उखडणे, डांबर नाहीसे होणे यामुळे हा पाटण-पंढरपूर हायवे आहे की गल्ली बोळातील रस्ता आहे इतकी बिकट अवस्था या  रस्त्यांची झाली आहे. यापूर्वी जागोजागी ठिगळे दिलेले डबरे पुन्हा उखडल्याने या मार्गाचे कधी डांबरीकरण झाले होते की नाही असा गंभीर प्रश्‍न पडत आहे.
गतवर्षापासून हे दोन्ही मार्ग इतके गाजले की व्हॉटसप ते वृत्तपत्रात सातत्याने ते चर्चेचे विषय ठरत होते. यातच संतप्त ग्रामस्थांनी एक खड्डा एक बोंब व शिवी देत श्रमदानाने डबरे  भरत आनोखे आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. त्याप्रमाणे रविवारी हे आंदोलन होवून ते चांगलेच गाजले व परिसरात या अनोख्या आंदोलनाची जोरदार चर्चा  झाली. संतप्त आंदोलकांनी 5 ते 7 डबरने भरलेले ट्रॅक्टर जागोजागीच्या डबर्‍यात ओतून स्वत: श्रमदान केले व सार्वजनीक बांधकाम विभागाला शिव्यांची लाखोली वाहत जाहीर निषेध  नोंदवला. हे आंदोलन वडोली भिकेश्‍वर,मसूर,किवळ अशा तिन ठिकाणच्या रस्त्यावर करण्यात आले.यावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी उंब्रजचे पोलीस निरीक्षक  ज्योतीराम गुंजवटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाची दखल घेवून बांधकाम खात्याने मसूरच्या मुख्य चौकात खडी आणून टाकल्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी डांबर कुठे  आहे. असा सवाल करीत डांबर नसले तर नुसते मुरूमाने खड्डे भरू नका असे सांगून कामगारांना काम करण्यास अटकाव केला.
यावेळी प्रदीप साळुंखे, नामदेव साळुंखे, सुधीर जाधव, अशोक मदने, प्रमोद देशमाने, उमेश काशीद, प्रमोद डकरे, सुधीर साळुंखे, बाळासाहेब कांबीरे, अमोल कांबीरे, लखन साळुंखे,  अमित चव्हाण, मनोज जगदाळे, अधिक साळुंखे, प्रशांत यादव, अजित केंजळे, अमोल मुळीक, ईश्‍वर जंगम, अमोल पाटोळे, विष्णू पवार, राहूल साळुंखे, ऋषिकेश साळुंखे, महेश  साळुंखे, किसन पावशे, सागर साळुंखे, वैभव साळुंखे, धैर्यशील साळुंखे, निलेश शिंदे, सदाशिव भंडारे, राम जाधव, सुयोग बेंद्रे यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.