Breaking News

डेंग्यूबाबत महापालिका जबाबदारी झटकत आहे - आ. प्रणिती शिंदे

सोलापूर, दि. 09, नोव्हेंबर - शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियासारखे साथीचे आजार शहरात सुरू आहे. डेंग्यूने करणराज पोळ या बालकाचा मृत्यू झाला असताना महापालिका  जबाबदारी झटकत आहे. महापालिकेने डेंग्यूवर प्रतिबंध करणारे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे. तसेच गोळ्या उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.  पोळ कुटुंबीयांंना महापालिकेने मदत करावी, अशी मागणी मनपा आयुक्तांकडे आमदार शिंदे यांनी केली. रक्त घेऊन पुणे येथे चाचणीसाठी पाठवले असता, 24 तास कालावधी  लागतो. त्यामुळे उपचार करण्याचे नेमके कारण डॉक्टरांना समजून येत नाही. सोलापुरात डेंग्यूची पूर्ण चाचणी करण्याची लॅब उपलब्ध करून द्यावी. पांढर्‍या पेशी रक्तपेढीत मिळून  येतील, यासाठी महापालिकेने नियोजन करावे.स्वाइन फ्लूबाबत महापालिकेने जनजागृती करून फवारणी धुरावणी करावी. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी नियोजन करावे. हिवाळ्यात  स्वाइन फ्लूसारखे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयात लस उपलब्ध करून द्यावी. मनपा दवाखान्यात स्वतंत्र हॉलची व्यवस्था करावी, अशी  मागणी शिंदे यांनी केली आहे.
मनपा दिशाभूल करतेय. शहरात डेंग्यूने अनेकांचे मृत्यू झाले असताना एकही जणाचा मृत्यू डेंग्यूने झाला नाही, असे सांगण्यात येते. आठ वर्षांच्या करणराज पोळ याचा डेंग्यूने मृत्यू  झाला, तशी नोंद महापालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या मृत्यू दाखल्यावर आहे. असे असताना एकाही रुग्णाचा मृत्यू डेंग्यूने झाला नाही, असे म्हणणे म्हणजे महापालिका जनतेची  दिशाभूल करत असल्याचे आमदार शिंदे म्हणाल्या.