एसटी संपकाळात पासधारकांची गैरसोय झाल्याने चार दिवस वाढवून मिळण्याची मागणी
पुणे, दि. 09, नोव्हेंबर - राज्य एस.टी. परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेल्या बेमुदत संपामुळे पासधारकांची गैरसोय झाली आहे. त्या काळात मंडळाने सेवा न दिल्याने पासधारकांना चार दिवस वाढवून मिळावेत, अशी मागणी पासधारक दत्तात्रय फडतरे यांनी केली आहे. तसे पत्रही त्यांनी परिवहन विभाग आणि राज्यपालांना पाठवले आहे. मात्र त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 17 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत एसटी सेवा पूर्णपणे बंद होती. या काळात पासधारकांची गैरसोय झाली. त्यामुळे पासला मुदतवाढ मिळावी या संदर्भात फडतरे यांनी 21 ऑक्टोबर रोजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना पत्र पाठवले होते. तसेच परिवहन कार्यालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला इमेलद्वारे संपर्कही केला होता. मात्र परिवहन कार्यालयाकडून कोणताचा प्रतिसाद आला नाही. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र, आपला इमेल परिवहन विभागाला पाठवण्यात आल्याची प्रतिक्रिया आली आहे. या घटनेलाही 15 दिवस उलटून गेले आहेत. असे असताना संबंधित विभागाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही अथवा प्रतिसादही मिळाला नसल्याची तक्रार फडतरे यांनी केली आहे. एसटीने नियमित प्रवास करणार्यांमध्ये ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थी, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्यावसायिक, कामगार, नोकरदार यांचा समावेश असतो. त्यामुळे यावर विचार करावा अशी मागणी फडतरे यांनी केली आहे.
