Breaking News

इसिसची मुंबई विमानतळावर हल्ल्याची धमकी


मुंबई : २६ जानेवारी २०१८ रोजी किंवा कधीही कार्गोवर हल्ला करण्यात येणार, अशा आशयाची चिठ्ठी कार्गोतील प्रसाधनगृहात आढळल्याने खळबळ माजली आहे. बॉम्बशोधक पथक सीआयएसएफकडून कार्गो विभागात ॲलर्ट जारी करण्यात येऊन संपूर्ण कार्गोची तपासणी सुरू करण्यात येत आहे. दक्षता म्हणून येथील कार्गो टर्मिनल रिकामे करण्यात आले आहे.

बुधवारी सायंकाळी मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागात असलेल्या प्रसाधनगृहात एक चिठ्ठी आढळली. '२६ जानेवारी २०१८ किंवा कधीही विमानतळाच्या कार्गो विभागावर हल्ला करण्यात येईल. हा हल्ला इसिस किंवा इतर दहशतवादी संघटना करू शकतील,' असे या चिठ्ठीत नमूद करण्यात आल्याने विमातळाची सुरक्षा करणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) व मुंबई पोलीस खडबडून जागे झाले.