Breaking News

हिंदु राष्ट्र सेनेचा महापालिकेवर मोर्चा

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - धार्मिक स्थळांच्या कारवाईवरून हिंदु राष्ट्र सेनेने आज महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना घेराव घातला. महापालिकेकडून सध्या अनधिकृत धा र्मिक स्थळांची अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. त्यास विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार महापालिका प्रशासनाने गुरूवारी व शुक्रवारी उपनगरातील अनधिकृत धार्मिक स्थळांची अतिक्रमणे भल्या पहाटे हटविली. त्यास आक्षेप घेत शुक्रवारी  विविध संघटनांनी आंदोलन केले होते. सोमवारी पुन्हा या संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना घेराव घातला. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे  पालन करावे परंतु आजतागायत उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. उच्च न्यायालयाने सार्वजनिक  वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या धार्मिक स्थळांसदर्भातील आदेश महापालिकेला दिलेला नाही. संपूर्ण राज्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे. उच्च  न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे परंतु त्या आदेशाचा महापालिकेकडून बागुलबुवा केला जात आहे, असा आरेाप निवेदनात करून मिर्झा सलत बेग विरूध्द तत्कालिन नगरपालिका  व ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपक हटविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेला आहे. या आदेशाची देखील महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी  करावी, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.  या आंदोलनात सागर ठोंबरे, परेश खराडे, घनशाम बोडखे, महेश निकम, सचिन पळशीकर, सागर ढुमणे सतीष मोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.