अवैधरित्या वाळू घेऊन जाणारे सात हायवे टिप्पर जप्त
बीड, दि. 11, नोव्हेंबर - पोलिस अधिक्षकांच्या पथकाने पहाटे दिंद्रुड, सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या वाळू घेऊन जाणा-या वाहनांवर कारवाई करून सात हायवे टिप्पर जप्त करुन संबंधीतांविरोधात गुन्हे दाखल केले. पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने आज शुक्रवारी पोलिस स्टेशन दिंद्रुड हद्दीतील मोहा रोडवरील आंबेडकर चौका जवळून जाणारे एम.एच.40-4683 क्रमांकाची टिप्पर पकडले. यामध्ये 5 ब्रास वाळू आढळून आली. रात्री 1 वाजता दिंद्रुड पोलिस ठाण्याच्या स्वाधीन सदरील टिप्पर करण्यात आले. तसेच पोलिस स्टेशन सिरसाळा हद्दीत पहाटे 4 ते 5 च्या दरम्यान सोनपेठ जिल्हा परभणी येथून चोरटी व अवैध वाहतूक करणारे 7 टिप्पर ताब्यात घेण्यात आले. 1 कोटी 6 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एमएच 23 डब्ल्यू 3737, एमएच 15-एजी 8215, एमएच 46 बीबी-0782, एमएच 44-7526, एमएच 44-9941, एमएच 44-3222, एमएच 48-5349 या क्रमांकाचे हे हायवे टिप्पर पकडण्यात आले. हे टिप्पर पुढील कार्यवाहीसाठी सिरसाळा पोलिस ठाण्याकडे सुपुर्द करण्यात आले.
