Breaking News

योगेश पाटील यांच्या ‘कलर्स ऑफ इंडिया’ माहितीपटास प्रथम पुरस्कार

जळगाव, दि. 07, नोव्हेंबर - अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र व ‘सैराट’ फेम मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘आटपाट’ प्रॉडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित राष्ट्रस्तरीय विवेक लघुपट व माहितीपट स्पर्धेत जळगावचा उदयोन्मुख दिग्दर्शक योगेश पाटीलच्या ‘कलर्स ऑफ इंडिया’ या माहितीपटाला प्रथम पुरस्कार मिळाला असून  त्यांना मुंबई येथील रविंद्र नाट्यमंदिरात गौरविण्यात आले.
‘कथालय’ संस्था शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव 2017’ या स्पर्धेसाठी राज्यातील अनेक चित्रपट निर्मात्यांनी लघुपट व मा हितीपट पाठविले होते. त्यात जळगाव येथील ‘कथालय’ संस्थेचे योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने कलर्स ऑफ इंडिया या माहितीपटाची नोंदणी केली होती. यात योगेश  पाटील यांच्या माहितीपटाला प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आला असून दहा हजार रूपये, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा अभिनेत्री सोनाली कुळकर्णी यांच्या हस्ते  सन्मान करण्यात आला.
सर्व स्थानिक कलावंत ‘कलर्स ऑफ इंडिया’ या माहितीपटाची संकल्पना व दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: योगेश पाटील यांनी सांभाळली असून त्यास सहाय्यक दिग्दर्शक म्हणून  धनंजय पाटील व मोना तडवी यांनी साथ दिली आहे. योगेश बेलदार (जळगाव) व चंद्रकांत भोईटे (जामनेर) हे या माहितीपटाचे निर्माते असून प्रशांत चौधरी व राहुल निंबाळकर हे क ॅमेरामन आहेत.