Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसने घातले नोटबंदीचे वर्षश्राद्ध!

बुलडाणा, दि. 09, नोव्हेंबर - आज एक वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधानांनी एक हजार व पाचशे रुपयांची चलनी नोट बंद करुन नवीन चलन आणले होते. त्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.8 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वात नोटबंदीचे वर्षश्राद्ध असे आगळेवेगळे आंदोलन क रण्यात आले. 
नोटबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य व्यवसायिक मोठ्या प्रमाणात उध्वस्त झाला. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. उद्योग व व्यापार बंद पडले, 2.2  टक्क्याने विकास दर घसरला. अनेक तरुण बेरोजगार झाले. त्यांच्या हाताला काम मिळेनासे झाल्याने प्रचंड बेरोजगारीसह गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. अनेकांना आपले मुळ गाव  सोडावे लागत आहे. सर्वसामान्य नागरिक जीवन जगण्यासाठी नोकरीच्या शोधात भटकंतीवर आहे. नोटबंदीनंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी प्रचंड रांगा लावाव्या लागल्या. त्यामध्ये  निरापराध 125 भारतीयांचे चेंगराचेंगरीमुळे प्राण गेले. अजूनही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आली नसल्याने संतप्त नागरिकांनी ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टीने संपूर्ण पाठिंबा दिला आहे. आमचा पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने असल्याने आम्ही नोटबंदीमुळे शोकमग्न अवस्थेत असल्याने आज या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झाले  असल्याने आम्ही सरकारविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, अ‍ॅड.साहेबराव सरदार, डा ॅ.गणेश बाहेकर, अ‍ॅड.सुमीत सरदार आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.