Breaking News

राष्ट्रवादीचे शुक्रवारी सांगली महापालिकेसमोर चाबूकफोड आंदोलन

सांगली, दि. 16, नोव्हेंबर - सांगली महापालिका गत दोन वर्षापासून सर्वकामे ठप्प झाली आहेत. महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ही विकासकामे अडवली जात असून याचा सर्वसामान्य सांगलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराविरोधात सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी महापालिका मुख्यालयासमोर चाबूकफोड आंदोलन करण्यात येणार आहे.


महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्याप्रमाणात विकासकामे रेंगाळली आहेत. विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सहा- सात महिने होत आले तरी नि विदा उघडल्या जात नाहीत. याशिवाय वर्कऑर्डर देण्यासही जाणीवपूर्वक विलंब लावला जात आहे. गत दोन वर्षापासून अनेक विकासकामांचे प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पडून आहेत. 

याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही लक्ष दिले जात नाही. वास्तविक, निविदा प्रसिध्द झाल्यानंतर पुढील 15 दिवसात संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देणे बंधनकारक आहे. मात्र महापालिका प्रशासन या कामालाही विलंब करीत आहे. सांगली व कुपवाड शहरवासियांसाठी सुरू असलेली 56 व 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राचे काम रखडले असून पाणीपुरवठा योजनाही अद्याप पूर्ण झालेली नाही. 

कुपवाड शहरातील ड्रेनेज योजनेच्या जागेबाबत महासभेने महापालिका आयुक्त रविंद्र खेबूडकर यांना प्राधिकृत केले आहे. परंतु अद्याप त्यांनी जागाही निश्‍चित केली नाही. त्यामुळे कुपवाड शहर ड्रेनेज योजनेला मान्यता मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे काम देखील अपूर्ण आहे, तर महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळा बसविण्याचे काम देखील मार्गी लागले नाही. मिरज रस्त्याची विकासकामे प्रलंबित आहेत. याशिवाय कोट्यवधी रूपयांची विकासकामे केवळ महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच प्रलंबित आहेत. ही सर्व विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, या मागणीसाठीच सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी महापालिका मुख्यालयासमोर चाबूकफोड आंदोलन करण्यात येणार आहे.