Breaking News

’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा 13 ते 17 डिसेंबर दरम्यान

पुणे, दि. 16, नोव्हेंबर - आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा ’सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा 13 ते 17 डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. हा महोत्सव रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात येणार आहे. 13 डिसेंबर रोजी मधुकर धुमाळ यांच्या सनई वादनाने दुपारी 3 वाजता महोत्सवाला सुरुवात होणार आहे. महोत्सवाचे हे 65 वे वर्ष आहे. यंदाच्या महोत्सवात 28 कलाकार आपली कला सादर करतील. 1 डिसेंबर पासून तिकीट विक्रीस सुरुवात होणार आहे.

पहिल्या दिवशी सनई वादनानंतर पंडित भीमसेन जोशी यांचे मार्गदर्शन लाभलेले डॉ. विजय राजपूत यांचे गायन आणि कोलकताचे देबाशीष भट्टाचार्य यांचे चतुरंगी (स्लाईड गिटार) वादन होईल. त्यानंतर बनारस घराण्याचे पं. राजन-साजन यांचे गायन होणार आहे. तर पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासीया यांच्या बासरीवादनाने पाहिल्या दिवसाची सांगता होईल.
महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात कुमार गंधर्वाचे नातू भुवनेश कोमकली यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर कलारामनाथ यांचे व्हायोलियन वादन होणार आहे. यानंतर प तियाळा घराण्याच्या गायिका कौशिकी चक्रवर्ती याचे गायन होईल. मेवाती घराण्याचे संगीतमार्तंड पं जसराज यांच्या गायनाने दुसर्‍या दिवसाची सांगता होईल. यंदाच्या महोत्सवात पहिल्या व चौथ्या दिवसाची वेळ दुपारी तीन ते रात्री 10 अशी असेल आणि दुसर्‍या आणि तिसर्‍या सत्राची (14 आणि 15 डिसेंबर) रोजी ही वेळ दुपारी चार ते रात्री 10 अशी असेल. 17 डिसेंबर या शेवटच्या दिवशी महोत्सवाची वेळ सकाळी 11.45 ते रात्री 10 अशी असेल.
या संपूर्ण महोत्सवासाठी सिझन तिकिटे उपलब्ध करून दिली जाणार असून खुर्चीसाठी संपूर्ण सत्रासाठी तिकीट दर चार हजार आणि तीन हजार असेल. भारतीय बैठकीसाठी संपूर्ण सत्राच्या तिकिटाची किंमत 500 रुपये तर दर दिवसाची तिकीट विक्री किंमत 150 रुपये असेल. शेवटच्या दोन दिवसाची तिकीट किंमत 200 रुपये असेल.