Breaking News

नोटा बंदी : काळा पैसा, भ्रष्टाचार, आतंकवाद, बनावट नोटांपैकी कोणतेच ध्येय साध्य झालेले नाही - संजय निरुपम

मुंबई, दि. 09, नोव्हेंबर - गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर, 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी सारखा अत्यंत अघोरी निर्णय जाहिर केला आणि संपूर्ण भारत  देशात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी जाहिर करताना म्हणाले होते की नोटाबंदीमुळे आपल्या देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा, आतंकवाद, खोटया नोटा हे  सगळे बंद होईल पण यापैकी कोणतेच ध्येय्य साध्य झालेले नाही. याउलट संपूर्ण गरीब जनता व सर्व सामान्य माणूस देशोधडीला लागला. स्वतःचेच कष्टाचे पैसे काढताना जनतेचे  हाल झाले. 115 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अत्यंत अघोरी निर्णयाला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात काळा दिवस  पाळण्यात आला. तसेच नोटबंदीमुळे मृत्युमुखी पडलेले निष्पाप लोकांसाठी भाजपा सरकारचे आझाद मैदानात आज “श्राध्द’’ घालण्यात आले.
नरेंद्र मोदी यांची नोटाबंदी संपूर्णतः फेल झालेली आहे. 500 व 1000 च्या नोटा बंद करून 2000 च्या नोटा आणून भ्रष्टाचार वाढवला आहे. पनामा आणि पॅराडाईस पेपर मध्ये  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी आणि भाजपा सरकारचे लोक असल्यामुळेच नरेंद्र मोदी या प्रकरणांची चौकशी आणि कारवाई करत नाही आहेत. ना खाउंगा ना खाणे दुंगा  बोलणारे नरेंद्र मोदी स्वतः भ्रष्टाचार्‍यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. जय अमित शहा याची चौकशी का केली जात नाही ? कारण त्यामध्ये सर्व अमित शहाचा पैसा आहे. पनामा आ णि पॅराडाईस पेपर मध्ये महानायक अमिताभ बच्चनचे नाव आले आणि अमिताभजी भाजपाचे “सदिच्छा दूत’’ आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाव सहारा व बिर्ला डायरी मध्ये होते, त्याची  चौकशी झालेली नाही. नरेंद्र मोदी यांचे सर्व सहकारी भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत पण त्यांची चौकशी किंवा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. परंतु व्यापारी आणि उद्योजक यांच्या  मागे सीआयडी, इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा ससेमिरा मागे लावतात. भ्रष्टाचाराविरोधात बोलणारे अधिकारी चौकशी आणि कारवाईच्या फेर्‍यात अडकतात. नोटाबंदीमुळे अनेक  तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक उद्योगधंदे बंद पडले, जीडीपी घसरला, आतंकवाद वाढला, रोज भारताच्या सीमेवर आपले जवान शहीद होत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी  संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागावी, असे उद्गार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आझाद मैदानात काढले. आज काँग्रेसतर्फे 8 नोव्हेंबर काळा दिवस आणि भाजपा  सरकारचे श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी रीतसर ब्राम्हण येऊन पिंडदान करून काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण करून भाजपा सरकारचे श्राद्ध घालण्यात आले.