आठवड्यात सेन्सेक्स १ टक्का वधारला
मुंबई : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग सातव्या सत्रात तेजीची नोंद होऊन आठवड्याची सांगता झाली. त्यामुळे मागील संपूर्ण आठवड्यात बीएसई सेन्सेक्समध्ये एकूण १ टक्का वाढ झाली. शुक्रवारी सेन्सेक्स ९१.१६ अंक उसळून ३३६७९.२४ पातळीवर बंद झाला. तसेच एनएसई निफ्टी ४०.९५ अंक उसळून १०३८९.७० पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात ०.२७ टक्का तेजी आली. त्याचप्रमाणे अधिक व्यापक असलेल्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांत सरासरी अर्धा टक्का तेजी आली. बाजारात दिवसभरात एकूण २८९४ कंपन्यांच्या शेअर्सचे खरेदी-विक्री व्यवहार झाले. त्यापैकी १५१३ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वधारले तर १२२७ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव घसरले.
तथापि, १५४ कंपन्यांच्या शेअर्सचे भाव अचल राहिले. तसेच शुक्रवारी सर्व क्षेत्रीय निर्देशांकांत तेजीची नोंद झाली. कन्झ्युमर ज्युरेबल्स निर्देशांकात सर्वाधिक २.७९ टक्के तेजी आली. तर आयटी आणि टेक्नोलॉजी निर्देशांकात प्रत्येकी पाऊण टक्का तेजी आली.
तसेच ऑईल अँड गॅस निर्देशांकात ०.६९ टक्का तर पॉवर आणि हेल्थकेअर निर्देशांकात प्रत्येकी ०.५८ टक्का तेजी आली. त्या खालोखाल एफएमसीजी आणि एनर्जी निर्देशांकात सरासरी ०.४३ टक्का तर ऑटो निर्देशांकात ०.३८ टक्का तेजी आली. तसेच बँकेक्स, रियाल्टी, पीएसयू आणि कॅपिटल गुड्स निर्देशांकात अल्प प्रमाणात तेजी आली.