पिंपरी चिंचवडकर तुकाराम मुंढेच्या प्रतिक्षेत
अत्यंत कार्यक्षम अशी तुकाराम मुंढे यांची ओळख असली, तरी पिंपरी चिंचवडचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना अद्याप वेळ मिळालेला नाही. पिंपरी महापालिका पीएमपीला एकूण खर्चापैकी 40 टक्के रक्कम देते. मात्र, त्या तुलनेत शहराला सुविधा मिळत नाहीत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पिंपरी चिंचवडमधील पीएमपीत पिंपरीतील कर्मचार्यांच्या बदल्या पुण्यात केल्या अन पुण्यातील कर्मचार्यांच्या पिंपरीला बदल्या झाल्या आहेत. संचयन तुटीचे कारण दाखवून पिंपरीतील अनेक मार्ग बंद केले आहेत. पुणे-मुंबई महामार्ग सोडला, तर शहरातील अंतर्गत भागातील बस वाहतूक कोलमडली आहे.
तसेच पिंपरी चिंचवड परिसरात जुन्या गाड्या पाठविल्या जात असल्याने रस्त्यावरच बंद पडून प्रवाशांची गैरसोय होण्याच्या घटना वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांचे बस पास आणि गाड्या वेळेवर न येण्याच्या तक्रारी कमी झालेल्या नाहीत. तुकाराम मुंढे यांनी प्राधिकरणाचा पदभार स्वीकारला असता, तर त्यांना इथले प्रश्न सोडविता आले असते. मुंढेंची नियुक्ती झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांचे प्रश्न सुटतील आणि नागरिकांना चांगली प्रवासी वाहतूक मिळेल, अशी आशा होती.
मात्र, गेल्या काही महिन्यात वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. काही काळ महापालिकेने निधी अडविण्याचाही प्रयत्न केला होता. नागरिकाच्या तक्रारी वाढल्याने महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि स्थायी समितीचे सभापती सीमा सावळे यांनी मुंढे यांना महापालिकेत बोलावले होते. शहरातील संस्थांचे कार्यक्रम व व्याख्याने यासाठी मुंढे यांना वेळ मिळतो.
मात्र, पिंपरी चिंचवडमधील पीएमपीच्या बस वाहतुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांना वेळ नाही. महापालिकेने तीन वेळा पत्र दिले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही विनंती केली आहे. मात्र, मुंढे यांनी प्रश्न जाणून घेण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि नागरिकांकडून टीकेची झोड उठ विली जात आहे.