Breaking News

मुख्यमंत्र्यांचा गृह विभागावर वचक नाही - राजू शेट्टी


सांगली, दि. 26, नोव्हेंबर - सांगली शहर पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबियाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने हा लढा सुरूच राहणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी दिला. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता व्यक्त करून गृह विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंकुश राहिलेला नाही, अशी टीकाही राजू शेट्टी यांनी केली. 

अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी तत्कालीन सांगली शहर पोलिस उपअधिक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे, या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा, हा खून खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व या खटल्याकामी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते.


विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या महामोर्चाची सुरूवात झाली. या महामोर्चाचे नेतृत्व राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगली महापालिकेचे माजी महापौर सुरेश पाटील, शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेचे नगरसेवक शेखर माने, माजी नगरसेवक पृथ्वीराज पवार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अ जित अभ्यंकर व अवामी विकास पार्टीचे संस्थापक सेवानिवृत्त पोलिस आयुक्त समशेर खान पठाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर येताच या महामोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

सर्वपक्षीय कृती समितीचे मुख्य निमंत्रक स्वाभिमानी विकास आघाडीचे सहसचिव सतीश साखळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ते महेश खराडे, शिवसेनेचे युवा नेते सांगली महापालिकेचे नगरसेवक गौतम पवार, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष युसुफ उर्फ लालू मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते आशिष कोरी, मराठा समाज संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे महेश पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, सांगली जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख व आसिफ बावा आदींनी या महामोर्चाचे आयोजन केले होते.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा