Breaking News

ताईला न्याय मिळाला ....पण?

कुमार कडलग : बहुचर्चित,क्रौर्याच्या सीमा पायदळी कुस्करणारी,मानवता,माणूसकीला लाजवेल या प्रतिक्रियेलाही निशब्द करणारी निर्दयी घटना म्हणून वर्णन झालेल्या कोपर्डी प्रकरणाचा अपेक्षित फैसला झाला आणि कायद्याच्या पातळीवर न्याय झाला.इथपर्यंत सारे काही ठिक असले तरी या निर्णयानंतर निर्माण झालेले काही प्रश्न केंव्हा निकालात निघणार हा मुळ प्रश्न समाजव्यवस्थेत कळ लावण्यास कारणीभूत ठरू पहात आहे.


दैनिक लोकमंथन च्या बातम्या तुमच्या Whatsapp गृपवर मिळविण्यासाठी 8530730485 हा नंबर तुमच्या गृपवर Add करा

या मुद्याचे विश्लेषण करण्यापूर्वी वाचकांनी या विश्लेषणातून कुठलाही गैर संदेश अथवा समाजात फुट पाडण्याचे कष्ट घेऊ नये,या विश्लेषणाचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावून समाजात फुट पाडण्याचे घाणेरडे राजकारण करू नये.तापलेल्या वातावरणाचा फायदा लाटून स्वार्थी राजकारणाची पोळी भाजून घेऊ नये.आपल्या पोटभरू व्यावसायीक राजकारणासाठी रक्तपंचमी खेळू नये.

गांभीर्याने निर्माण झालेल्या प्रश्नांचे अवलोकन करून वास्तवाला सामोरे जाऊन मार्ग काढण्याचे धाडस दाखवावे.सामाजिक सलोख्यासाठी हाच एकमेव पर्याय दिसतो आहे जो अनिवार्य आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डीच्या प्रकरणाचा निकाल लागला,या निकालाच्या प्रतिक्षेसंदर्भात उत्सुकता शिगेला पोहचली असे सांगितले जात असले तरी या तिन्ही संशयित नराधमांना फाशी होणार ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे संकेत आधीच मिळाले होते.

शिक्षा सुनावणीची औपचारिकता तेव्हढी शिल्लक होती.तीही पुर्ण झाली अन् मराठा क्रांती मोर्चात चैतन्य पसरले.विशेष सरकारी वकीलांवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.या स्वाभाविक आनंदमय वातावरणात दुसर्या बाजूने अत्यंत प्रतिकुल प्रतिक्रीया उमटत होत्या.

या दोन्ही प्रतिक्रिया एकमेकावर आदळून उडणार्या सामाजिक फुटीच्या ठिणग्या सलोखा पेटविण्यास कारणीभूत ठरतात की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली.तथापी तळागाळातील दोन्ही बाजूचा समाज काही उत्पादी मंडळींचे उद्योग समजून घेण्याइतपत सजग झाल्याने कुटील प्रवृत्तींचा कुट हेतू अद्याप तरी साध्य झाला नाही,हे समाजाचे सुदैव.भविष्यातील धोका माञ टळलेला नाही.

संधीसाधू संधी शोधत राहतील.म्हणून जागता पहारा आवश्यक ठरणार आहे. कोपर्डीचा निकाल येण्यापुर्वी चार दिवस आधी खर्डा येथील नितीन आगे प्रकरणाचा निकाल आला.यातील सारे संशयित निर्दोष सुटल्यामुळे समाजात निराशा आणि संतप्त भावनांची लाट पसरली होती,त्या नंतर या दोन्ही प्रकरणांची तुलना सुरू झाली आहे.नितीन आगे प्रकरणाच्या जोडीला अकरा वर्षापुर्वीच्या खैरलांजी प्रकरणाचेही उदाहरण दिले जात आहे.वास्तविक कुठल्याही दोन न्यायिक प्रकरणांची तुलना करणे इष्ट नाही.

प्रत्येक प्रकरणाची पार्श्वभूमी स्वाभाविकपणे वेगळी असते.गुन्हा दाखल करतांना कायद्याची कलमं सारखी लावली गेली असली, इतकेच काय तर घटनेतील क्रौर्यही सारखे असले तरी एका सारखा दुसरा निकाल लागावा ही अपेक्षा न्यायव्यवस्थेकडून ठेवता येत नाही.

या विधानाचा सोयीस्कर अर्थ न काढता वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी.न्याय करणे न्याय व्यवस्थेच्या हातात असले तरी न्याय व्यवस्थेसमोर संबधित प्रकरण कुठल्या तिव्रतेने ठेवले जाते,या प्रक्रीयेत एखादा सुप्त हेतू कार्यरत आहे का,या गोष्टी निकालाच्या भवितव्यावर परिणाम करीत असतात.म्हणजेच प्रकरणाचा तपास कुठल्या दिशेने आणि हेतूने केला जातो हेच महत्वाचे ठरते.

म्हणूनच कोपर्डी किंवा नितीन आगे प्रकणाच्या निकालानंतर न्यायव्यवस्थेवर उपस्थित केले जात असलेले प्रश्न किंवा कर्तव्य पुर्तीच्या व्यक्त होणार्या निरर्थक आणि असंयुक्तिक आहेत.न्यायव्यवस्थेने या दोन्ही प्रकरणात समोर असलेल्या पुराव्यांच्या आधारे आणि साक्षीदारांच्या जबानीनुसार आपले काम केले आहे.दोष काढायचाच असेल किंवा कौतूक करायचेच असेल तर संबधित तपास यंञणेचे करायला हवे.

या दोन्ही प्रकरणात तपास यंञणेची भुमिका निर्णायक ठरली आहे.खैरलांजी चे औचित्य आज इतक्या वर्षानंतर बाळबोध वाटते.खैरलांजीचे आज भांडवल करण्याचे औचित्य नाही.जिथवर सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे तिथे नितीन आगे प्रकरणाचे औचित्य स्वागतार्ह आहे. कोपर्डीला जो न्याय मिळाला तोच न्याय खर्डा प्रकरणालाही मिळायला हवा होता.माञ इथे पुन्हा तपास यंञणेचा हेतू आणि तपास दिशा,तिव्रता या गोष्टी महत्वाच्या ठरतात,त्यासाठी थोडे पार्श्वभूमीत डोकवायला हवे. 

कोपर्डी प्रकरण घडले तेंव्हा अखिल मराठा समाज संघटीत होऊन व्यवस्थेवर दबाव टाकण्यात यशस्वी झाला होता.सत्ताधिशांना आपल्या भावनांसमोर झुकविण्यात यशस्वी ठरला होता.मुख्यमंञ्यांना संशयितांना फासावर लटकविले जाईल असे विधान करण्यास भाग पाडले होते.इतकेच नाही तर विशेष सरकारी वकीलांचे पहिल्यापासून या प्रकरणाच्या तपासात बारीक लक्ष होते.

या सार्या गोष्टी तपासाच्या दिशेवर आणि हेतूवरही परिणाम करण्यास कारणीभूत ठरल्या असा निष्कर्ष काढण्यास पुरेसा वाव आहे.ती तिव्रता नितीन आगे प्रकरणात कुठेही दिसली नाही.हे प्रकरण घडले तेंव्हा बहुजन चळवळीने एक औपचारीकता निभावण्या पलिकडे कुठलेही स्वारस्य दाखविले नाही कोपर्डी प्रकणाच्या निकालाच्या क्षणापर्यंत असलेली तिव्रता आगे प्रकरणात दिसली नाही.

त्याचा परिणाम संशयितांना संशयाचा फायदा देण्यात तपास यंञणेला झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.या गोष्टी दुर्लक्षित करून मुळ उद्देशापासून फरफटत जाऊन न्याय व्यवस्थेवर शिंतोडे उडविण्याचे राजकारण काही हेतू धारीत मंडळी करीत आहेत.

या मंडळींना कोपर्डीच्या न्यायाशी देणघेण ना खर्डा प्रकरणातील अन्यायाशी सोयरंसुतक.त्यांना फक्त समाजात नांदणार्या सलोख्याला चेतवून पेटलेल्या शेकोटीवर शेकून स्वार्थाची उब मिळवायची आहे.या धोक्यापासून समाजाला वाचविण्यासाठी सजग आणि सुज्ञ समाजाने अजूनही नितीन आगेला न्याय देण्यासाठी सकल बहुजनांच्या ऐक्याची मोट बांधण्यास पुढाकार घ्यावा.हीच कोपर्डीच्या ताईला आणि खर्ड्याच्या भावाला खरी श्रध्दांजली ठरणार आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा