Breaking News

नगरच्या कलाकारांना पडलेले “सपान” लघुपटाच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे

नगरमध्ये सध्या लघुपट निर्मितीला चांगले दिवस आले असून या क्षेत्राकडे युवकांचा कल सतत वाढत आहे. शहरी व ग्रामीण भागात विविध विषयावर अनेक लघुपट तयार होत असून नगर व आष्टी तालुक्यातील कलाकारांनी एकत्र येऊन “सपान” लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपळखेड येथे संजय व्हिजनच्या “सपान” लघुपट निर्मितीचा शुभारंभ उद्योजक कान्तीलाला चनोदिया, चित्रपट निर्माते संजय घाडगे,सरपंच राजू गव्हाणे, मुख्याध्यापक मछीन्द्र शेळके ,गणेश कराळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ग्रामीण भागातील केरसुणी, झाडू तयार करणाऱ्या गरीब परिवारातील मुलाने शिक्षण घेऊन नाव कमवावे हे स्वप्न पाहणाऱ्या बापाचे “सपान” वास्तवात मात्र येते का हा प्रश्न व ग्रामीण भागातील शिक्षण व मुलांचा सध्याचा बदललेला कल यावर हा लघुपटात आधारित आहे. यातील सर्व कलाकार ग्रामीण भागातील व नवोदित असूनही त्यांनी मन लावून भूमिका केल्या आहेत .लवकरच हा लघुपट नगरकरांना पाहण्यास उपलब्ध होईल.

या लघुपटात पूजा दुधे,संदीप अडागळे,गणेश अडागळे, मंगेश शिरसाठ,सुनील अडागळे , संगीता अडागळे यांनी काम केले असून फिल्मचित्रीकरण आकाश कांबळे व बब्बू मनियार यांनी केले आहे .संकल्पना व स्थिरचित्रीकरण संदीप कांबळे यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील समस्या व सामाजिक विषयावर जनजागृती करणारे लघुपट संजय व्हिजन निर्मिती तर्फे लवकरच करण्यात येणार आहेत. या मध्ये ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन त्यांच्या कलांना वाव देण्यात येणार आहे.