Breaking News

नवी मुंबई महापौरपदी राष्ट्रवादीचे जयवंत सुतार, उपमहापौरपदी काँग्रेसचे मंदाकिनी म्हात्रे

नवी मुंबई, दि. 10, नोव्हेबर - नवी मुंबई महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत सुतार, तर उपमहापौरपदी काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे या विजयी झाले आहे. भाजपने  या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निवडणुकीत अपक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली होती, तर राज्यात युतीत दरी निर्माण झाल्याने या निवडणुकीत  भाजपने शिवसेनेला मदत न करण्याची भुमिका घेत बहिष्कार टाकला होता. या निवडणुकीत शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र होते.
महापौरपदाच्या निवडणूक घेण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची नेमणूक करण्यात आली होती. महापौरपदासाठी शिवसेनेचे उमेदवार सोमनाथ वास्कर व राष्ट ्रवादीचे जयवंत सुतार निवडणूक रिंगणात होते. वास्कर यांना 38 मते मिळाली, तर सुतार यांना 67 मते मिळाली, त्यामुळे सुतार हे विजयी झाल्याचे कल्याणकर यांनी जाहीर केले.  उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे मंदाकिनी म्हात्रे यांनी अधिकृत उमेदवारी दिली होती,तर जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी करून  उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. शिवसेनेतर्फे द्वारकानाथ भोईर यांना उमेदवारी दिली होती. आज अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने अर्ज मागे न  घेतल्याने झालेल्या निवडणुकीत मंदाकिनी म्हात्रे यांना 64 मते पडली आणि द्वारकानाथ भोईर यांना 38 मते मिळाली,तर वैजयंती भगत यांना 3 मते मिळाली. त्यामुळे म्हात्रे या  विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेस नेते भाई जगताप, आमदार संदीप नाईक, माजी  खासदार संजीव नाईक उपस्थित होते.
भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत म्हणाले की, शिवसेना सत्तेत असतांनाही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे, महापौरपदाची निवडणूक लागल्यावर त्यांनी आमच्याशी संपर्क  केला नाही. त्यांनी अद्यापपर्यंत आमच्याशी चर्चा केली नाही, त्यामुळे आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. भविष्यात शिवसेनेच्या भुमिकेत बदला झाला नाही, तर इतर  ठिकाणी देखील शिवसेनेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे रामचंद्र घरत यांनी स्पष्ट केले.
सुनील तटकरे म्हणाले की, नवी मुंबईत आघाडीबाबत मागील 15 वर्षांत ज्या चुका झाल्या त्या यापुढे अधिक योग्य संवाद ठेऊन दुरुस्त केल्या जातील. राज्यात आम्ही आमच्या  पद्धतीने पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नुकत्याच झालेल्या चिंतन बैठकीत धर्मनिरपेक्ष विचार धारा घेऊन वाटचाल करण्याचे ठरले आहे. भविष्यात विधानसभा  निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे निवडणुक लढविणे हे राजकीय शहाणपणाचे ठरणार आहे. काँग्रेस देशातील मोठा विरोधी पक्ष असल्याने काँग्रेसने आघाडीसाठी पुढाकार घेतला  पाहिजे. या संदर्भात आमची भुमिका अनुकुल राहिल,असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार वैजयंती भगत यांना शेवटच्या क्षणापर्यंत आपण उमेदवारी मागे घेण्याबाबत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी ऐकले नसल्याने त्या बाबतचा  कारवाई करण्यासाठीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे,अशी माहिती काँग्रेसचे आमदार तथा निवडणुक निरीक्षक भाई जगताप यांनी दिली.