Breaking News

शेतमाल तारण योजनेचा लातूरमध्ये शुभारंभ

लातूर, दि. 09, नोव्हेंबर - शेतमालाचे सतत कोसळणारे भाव त्यामुळे शेतक-यांची होणारी आर्थिक कोंडी यावर शेतमाल तारण योजना उपकारक ठरत आहे. लातूर, उस्मानाबाद,  बीड आणि नांदेड या पणन महामंडळाच्या विभागात लातूर जिल्ह्याच्या बाजार समितीने पहिला क्रमांक पटकावला आहे. आज लातूर बाजार समितीच्या एमआयडीसीतील गोदामात  आज या योजनेचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते झाला. लातूर सर्वाधिक सोयाबीन पिकवणारा जिल्हा आहे. यंदाही सोयाबीनच्या भावाचे वांदे झाले  आहेत. या पार्श्‍वभूमीवर ही योजना कामी येणार आहे. शेतकर्यांनी आपले सोयाबीन या योजनेत जमा केल्यास त्याला चालू भावाप्रमाणे 75 टक्के रक्क्म मिळेल. सहा महिन्यांपर्यंत त्याला  सहा टक्के व्याज लागेल. हे व्याज तीन टक्क्यांवर आणावे अशी विनंती पणन महासंघाला केली आहे. यावर्षी जगभरात सोयाबीनचे उत्पन्न कमी झाल्याने आपल्याकडे येणा-या काळात  सोयाबीनला चांगला भाव मिळू शकतो, शेतक-यांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन या प्रसंगी ललितभाई शहा यांनी केले. 1990-91 पासून पणन मंडळ ही योजना  राबवते. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड या चार जिल्ह्यांचा हा विभाग आहे. मागच्या वर्षी राज्यात लातूर बाजार समितीने दुसरा क्रमांक पटकावला. लातूर जिल्ह्याने या वर्षी  राज्यात पहिला क्रमांक मिळवावा असे लक्ष्य ठेवण्यात आले आहे असे या विभागाच्या उपसरव्यवस्थापक शुभांगी गोंड यांनी सांगितले. यावेळी या योजनेत सोयाबीन तारण ठेवणारे प हिले दोन शेतकरी वैभव पवार हरंगुळ आणि निळकंठ शेटे पाखरसांगवी यांचा सत्कार करण्यात आला.