लातूर, दि. 20, नोव्हेंबर - लातूर-अंबाजोगाई मार्गावरील महापूरच्या पुलाखाली मांजरा नदीत आज एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. सकाळच्या सुमारास बघ्यांची गर्दी वाढली तेव्हा पोलिसांना फोन करण्यात आला. हे घटनास्थळ रेणापूर पोलिसांच्या हद्दीत येत असल्यानं रेणापूर पोलिसांनी धाव घेतली. पोहणा-या निष्णात व्यक्तींना पाचारण करण्यात आलं. पावणेबाराच्या सुमारास पोहणारे दोघे पाण्यात उतरले. चालत जाऊन त्यांनी मृतदेह बाहेर आणला. पोत्याच्या आधाराने तो जमीनीवर ठेऊन पंचनामा करण्यात आला. मृतदेह ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी कमरेएवढेच पाणी होते. त्यामुळे बुडून मरण पावला असेल असे म्हणता येत नाही. वरुन येणारे पाणी अडविल्याने पाणी वाहणेही बंद आहे. त्यामुळे हा मृतदेह वाहत आला असेल असाही अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे घातपात करुन तो नदीत फेकण्यात आला असावा अशी शंका उपस्थितांमधून व्यक्त क रण्यात आली.