Breaking News

सिडकोची सदनिका विक्री योजना ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून

नवी मुंबई, दि. 07, नोव्हेंबर - नवी मुंबईतील सिडको निर्मित सदनिकांची विक्री आता ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून केली जाणार असून 6 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या सिवूडस  इस्टेट हाऊसिंग स्किम मधील उर्वरित सदनिकांची विक्री संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज स्विकृती व संलग्न प्रक्रिया राबविण्यात सुरूवात केली आहे.
या योजनेचा शुभारंभ सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या शुभहस्ते आणि मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगावकर, सहव्यवस्थापकीय संचालक  राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सिडकोतर्फे यापूर्वी गृहनिर्माण योजनेतील सदनिकांची विक्री योजना पुस्तिका घेऊन त्याद्वारे अर्ज सादर करण्यात येत असे. परंतु आतापासून मात्र सर्व गृहनिर्माण योजना ऑनलाईन  पध्दतीच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. या प्रक्रियेनुसार पहिली सिवूडस इस्टेट हाऊसिंग स्किम मधील उर्वरित सदनिकांची योजना आजपासून  सुरू करण्यात आली आहे.
ही ऑनलाईन योजना राबविण्याकरिता म्हाडाच्या धर्तीवर त्यांच्याच सहकार्याने आणि त्यांची सॉफ्टवेअर सहयोगी यंत्रणा प्रोबिटी सॉफ्ट प्रा. लि. यांचे सहकार्य घेतले जाणार आहे.  त्याचप्रमाणे ऑनलाईन पेमेंटसाठी क्सिस बँकेचे सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच ही संपूर्ण योजना सुरेश कुमार, माजी उपलोकायुक्त महाराष्ट्र शासन व मोईझ हुसैन, नॅशनल इन्फा ॅर्मेटीक सेंटर प्रमुख यांच्या नेतृत्वाखालील ओव्हर साईट समितीच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.