Breaking News

आरोग्य राज्यमंत्री सोलापूरचे; तरीही शासनाकडून मिळेना ’अ‍ॅन्टीरेबीज’

सोलापूर, दि. 19, नोव्हेंबर - शहरात 40 हजार मोकाट कुत्रे आहेत, त्याचा बंदोबस्त केला जात नाही. आरोग्य राज्यमंत्री सोलापूरचे असताना शासनाकडून अ‍ॅन्टीरेबीज इंजेक्शन पुरवठा का होत नाही? असा सवाल करीत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. 


स्थायी समितीने अखेर बहुमताने पाच लाख रुपयांची अ‍ॅन्टीरेबीज इंजेक्शन खरेदीस मान्यता दिली. महापालिका स्थायी समिती सभा शुक्रवारी सभापती संजय कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अ‍ॅन्टीरेबीज खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीत चर्चेला आला. 257 रुपये प्रतिलस अधिक पाच टक्के जीएसटी या दराने लस घेण्यास समितीने मान्यता दिली. 

शासनाच्या आरोग्य विभागाने इंजेक्शन पुरवणे आवश्यक आहे, पालिकेने तसा प्रयत्न करावा, असे महेश कोठे म्हणाले. महापालिकेसाठी इतर साहित्य खरेदी मार्केटप्लसकडून खरेदी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पोर्टलवरून करण्यात येणार आहे. त्यास दुस्तीसह एकमताने मान्यता देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मड्डीवस्ती येथे मनपा सफाई कामगारांची घरकुल योजना राबवण्यात येत आहे. घरकुलांची जागा बदलल्याने महापालिकेस दोन कोटी अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. त्यासाठी वाढीव 8.53 लाखांच्या कामास दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.