Breaking News

महा-ई-सेवा केंद्र चालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड , हिवाळी अधिवेशनात आ.कांबळे लक्षवेधी मांडणार


श्रीरामपूर तालुक्यातील तहसील व प्रांत कार्यालयाची सर्व कामांची जबाबदारी असलेल्या महा-ई-सेवा केंद्र चालकांवर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून त्या निषेधार्थ श्रीरामपूर तालुक्यातील सर्व केंद्र चालकांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारत आ.भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यासह प्रांत-तहसील अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

यावेळी बोलताना आ.भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले की, ऑनलाईन कामाच्या नावाखाली कुठलीही तांत्रिक बाब न तपासता शासनाने काही चुकीचे निर्णय घेतल्याने तालुक्यातील जवळपास १०० युवकांसह राज्यातील ५० हजार युवकांवर बेरोजगारीची वेळ येऊ नये म्हणून येत्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडणार आहे. केतन खोरे यांनी शासनाच्या विविध योजना मोफत अथवा माफक दरात राबवून त्याचा अनेक वर्षांचा मोबदला शासन व संबंधित कंपनीने केंद्र चालकांना दिला नाही. 

अनेक ठिकाणी कोणत्याही तांत्रिक बाबी न तपासता खाजगी कंपनीचे सेंटर दिले असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यावेळी आ.भाऊसाहेब कांबळे व नगराध्यक्षा अनुराधा आदिक, रईस जहागीरदार यांना केतन खोरे, सचिन आजबे, सचिन सोनी, प्रसाद लढा, विजय जाजू, आशिष सिंग, गजानन आठरे, निलेश उबाळे, योगेश शिंदे, नितीन बोरुडे, राहुल म्हस्के, निरंजन भोसले, संदीप काळे यांनी निवेदन दिले. 

यावेळी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार भाऊसाहेब तेलोरे, तहसील कार्यालयातील उगळे साहेब यांनाही निवेदन देण्यात आले. महा-ई-सेवा केंद्राच्या बंदमुळे नागरिकांनीही प्रशासनाच्या नावाने चांगलेच खडे फोडले.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा