Breaking News

चिपळूण नगरपालिकेचे मोबाइल अ‍ॅप

रत्नागिरी, दि. 18, नोव्हेंबर - शहरातील समस्यांविषयी पालिकेकडे तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाने मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या पालिकेकडे तक्रार करता येणार आहे. चिपळूण पालिकेने त्यात नोंदणी केली आहे.


शहरातील गटर स्वच्छ नाही, कचरा उचलला नाही, सार्वजनिक शौचालये स्वच्छ नाहीत अशा प्रकारच्या तक्रारी देण्यासाठी नागरिकांना पालिकेत धाव घ्यावी लागते. तक्रार नोंदविल्यानंतर कारवाईसाठी पालिकेत हेलपाटे मारावे लागतात. नगरविकास विभागाने ती गैरसोय दूर केली आहे. आता घरबसल्या स्मार्ट फोनवरील अ‍ॅपवरून तक्रार नोंदविता येणार आहे. 

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने हे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप वापरण्यासाठी अगदी सोपे आहे. त्यावर पसंतीची भाषा, आपला मोबाइल क्रमांक, तक्रार कोणत्या शहरातील आहे, तक्रारीचा विषय, तेथील जवळचे ठिकाण आदीची माहिती अ‍ॅपवर अपलोड केल्यानंतर आपली तक्रार संबंधित विभागाकडे पोहोचल्याचा संदेश येतो. 

त्यामुळे घरात बसून किंवा अगदी रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना समस्येविषयी तक्रार करता येणार आहे. चिपळूणच्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केले आहे.