Breaking News

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मिरज तालुका द्वितीय


सांगली, दि. 24, नोव्हेंबर - जलयुक्त शिवार अंतर्गत केलेल्या कामासाठी जिल्हास्तरीय व्दितीय पुरस्कार मिरज तालुक्यास प्राप्त झाला. सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे तसेच जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत तीन लाख रुपयांचा धनादेश कृषि विभागाच्या अधिकार्‍यांनी स्वीकारला. 

जलयुक्त शिवार अभियान सन 2015-16 अंतर्गत महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभागामार्फत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारासाठी अधिकारी कर्मचारी, गाव, पत्रकार यांच्यासाठी जलमित्र पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातून जिल्हा, विभाग व राज्यपातळीसाठी प्रस्ताव सादर केले होते.
तसेच ग्रामस्तरीय पुरस्कारात मिरज तालुक्यातील खटावला जिल्हास्तरीय तृतीय क्रमांक मिळाला. 

त्याकरिता 50 हजार रुपयांचा धनादेश बक्षीस स्वरुपात ग्रामपंचायत खटाव यांना प्रदान करण्यात आला. अधिकारी कर्मचारी पातळीवर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणार्‍या कर्मचार्‍यासाठी पुरस्कार ठेवण्यात आले होते. त्यामध्ये मिरज तालुक्यातील कृषि सहाय्यक खटाव अमितकुमार अशोक सूर्यवंशी यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराबाबत विविध संस्था, पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच शेतकरी या सर्वांकडून समाधान व्यक्त होत आहे. तसेच, तालुक्याचा लौकिक वाढविण्याचे काम जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झाल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच, पुरस्कारप्राप्त गाव, तालुका, कर्मचारी व पत्रकार यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
मिरज तालुक्यास मिळालेल्या पुरस्कार बाबतीत तत्कालिन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व तत्कालिन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. 

 सध्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हाधिकारी वि. ना. काळम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, मिरज उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली कामे सुरु आहेत. भविष्यातही तालुक्यात उत्कृष्ट काम करुन, जास्तीत जास्त पुरस्कार मिळविण्याचे ध्येय असल्याचे मत मिरज तालुका कृषि अधिकारी एच. एस. मेडीदार यांनी व्यक्त केले आहे.