Breaking News

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 96 मृत शेतकर्‍यांच्या वारसांना मिळाला लाभ

बुलडाणा, दि. 02, नोव्हेंबर - दुर्दैवाने अपघात होवून बळीराज्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. अशावेळी कुटूंबप्रमुख बळीराजा जर दगावला किंवा अपंग झाला, तर कुटूंब  आर्थिक संकटात सापडते. या परिस्थितीत बळीराजाच्या कुटूंबाला मोठ्या हिंमतीने सावरावे लागते. मात्र अशा बिकट प्रसंगी राज्य शासन शेतकर्‍यांच्या मदतीला धावून आले आहे.  दुर्दैवाने अपघात झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतंर्गत विम्याची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी शासनाने सर्व खातेदार शेतकर्‍यांचा विमा उतरविला  आहे. त्यामुळे शेतकरी कुटूंबाला अशा प्रसंगी विम्याची हमखास मदत मिळणार आहे. जिल्ह्यात सन 2015-16 मध्ये 96 मृत शेतकर्‍यांच्या वारसांना योजनेतंर्गत 192 लक्ष रूपयांची  मदत देण्यात आली आहे.
या योजनेतंर्गत शेतकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रूपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास  दोन लक्ष रूपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी  झाल्यास एक लक्ष रूपये मदत  दिल्या जाणार आहे. या लाभासाठी लाभार्थ्यांकडे सात बारा प्रमाणपत्र, 6  क, 6 ड (फेरफार) आदी पात्रता असावी. यामध्ये नोंदणीकृत असलेले 10 ते 75 वयोगटातील खातेदार शेतकर्‍यांचा विमा उतरविण्यात आला आहे.
विमा संरक्षणासाठी रस्ता/रेल्वे अपघात, उंचावरून पडणे, बुडून मृत्यू, सर्पदंश, प्राणीदंश, खून, जनावराचा हल्ला, दंगल, वीज पडणे, विषबाधा, नक्षलवादी हल्ला व इतर अपघात  आदींमधील अपघातांचा समावेश आहे. विम्याचा दावा करण्यासाठी दावा पत्र, वारसा नोंद, शेतकर्‍याचा वयाचा पुरावा, पोलीस (एफ आय आर) किंवा जवाब, बँक पासबुक प्रत,  सातबारा उतारा, तलाठी प्रमाणपत्र, 6 ड (फेरफार), उतारा 6 क, शव विच्छेदन अहवाल, पोलीस स्थळ पंचनामा, अपंगत्व आल्यास टक्केवारी प्रमाणपत्र, लाभार्थ्याचे स्टॅम्प पेपरवर  प्रतिज्ञापत्र, मृत्यू प्रमाणपत्र व पोलीस मरणोत्तर पंचनामा आदी कागदपत्रे आवश्यक आहे. राज्यातील जवळपास 1.37 कोटी खातेदार शेतकर्‍यांचा विमा शासनाने उतरविला आहे.  विम्याचा हप्ताही कंपनीकडे सुपूर्द करण्यात आला  आहे. दुर्देवाने अपघात झाल्यास अशा संकटसमयी केवळ कृषि कार्यालयात अर्ज भरून अपघातग्रस्त शेतकरी कुंटूंबीय विम्याची  मदत मिळवू शकतात. एवढी सुटसुटीत लाभाची ही योजना आहे.  जिल्ह्यात योजेनंतर्गत सन 2016-17 मध्ये 50 अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहे. त्यामधील 10 अर्ज मंजूर क रण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघातानंतर लवकरात लवकर संबंधित जिल्हा/तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांसहीत दावा अर्ज दाखल करावे. याकरिता क ोणताही वकील किंवा एजंट नेमण्याची आवश्यकता नाही. तरी अपघातग्रस्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते. या योजनेुळे घरातील कर्ता पुरूष  शेतकरी गेल्यामुळे हवालदील झालेल्या शेतकरी कुटूंबाला ही आर्थिक मदत जगण्याचे बळ देवून जाते.