Breaking News

भामट्याकडून व्यावसायिकाला 68 लाखाला गंडा

पुणे, दि. 11, नोव्हेंबर - काजूचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून एका गुजराती भामट्याने पुणेरी व्यावसायिकाला 68 लाख रुपयांचा गंडा घातला. 28 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर या कालावधीत स्वारगेट परिसरातील आकृती चेंबर्समध्ये ही घटना घडली. या गुजराती व्यापार्‍याच्या विरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून स्वारगेट पोलिसांची पथके अधिक तपासासाठी अहमदाबादला रवाना करण्यात आली आहेत. 
चिंतन शहा (रा. अहमदाबाद, गुजरात) या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दत्तात्रय मोरे (वय 49, रा. कुमार क्षितीज, सहकारनगर) यांनी यासंदर्भात स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांची पुण्यात केशर ऍग्रो लिमिटेड’ नावाची कंपनी असून स्वारगेट परिसरातील आकृती चेंबरमध्ये त्यांचे कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाल्याच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय चालतो. एका रशियन कंपनीने मोरे यांच्याकडे वर्षाला बाराशे किलो काजु पाठविण्याची मागणी केली होती.
शहा याची गुजरातमधील अहमदाबाद येथे प्रतिक एंटरप्रायझेस नावाची फर्म आहे. या फर्मच्या माध्यमातून काजुचा पुरवठा करण्यात येईल, असे शहा याने मोरे यांना कळविले होते. त्यासाठी तीस टक्के रकम अनामत म्हणून पाठवून द्यावी लागेल अशी अट शहा याने मोरे यांना घातली होती, त्यानुसार मोरे यांनी शहा यांना ही रकम पाठवून दिली होती. मात्र, त्याने ठराविक कालावधीत मोरे यांना काजुचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे मोरे यांनी शहा याच्याशी संपर्क साधला, त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मोरे यांनी जास्तच तगादा लावल्याने लवकरच काजु पाठवून देतो अशी बतावणी शहा याने केली, त्यासाठी शहा हा मोरे यांना घेऊन मेंगलोरला गेले. मेंगलोरला गेल्यानंतर शहा याने मोरे यांची व्यंकटरामन नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. ते एका कंपनीच्या एक्सपोर्ट डिव्हिजनचे मुख्य असल्याची बतावणीही शहा याने केली. त्यावेळी दोन ते तीन दिवसांत काजु पाठविण्याचे आश्‍वासन मोरे यांना देण्यात आले. मात्र, त्यांना काजु पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे मोरे यांनी पुन्हा शहा याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी आपण तुमची मागणी पूर्ण करू शकत नाही असे सांगत शहा याने मोरे यांना 68 लाख रुपयांचा धनादेश पाठविला. मोरे यांनी हा धनादेश त्यांच्या बँकेच्या खात्यावर भरला असता त्यांचे पेमेंट स्टॉप केल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांनी मोरे यांना सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक समाधान कदम अधिक तपास करत आहेत.