मुदत ठेवींतून पिंपरी महापालिकेला 50 कोटींचे उत्पन्न
पुणे, दि. 16, नोव्हेंबर - पिंपरी चिंचवड महापालिकेने दररोज मिळणारे उत्पन्न अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात विविध 12 ते 13 बँकांमध्ये ठेवल्याने, त्यातून पालिकेला व्याजापोटी सन 2016-17 या आर्थिक वर्षात 50 कोटी 11 लाख रुपये वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यापूर्वी पालिका दररोज मिळणारे उत्पन्न चालू खात्यात जमा करत होती. हे पैसे खात्यांमध्ये निष्क्रिय पडून असायचे. त्यामुळे चालू खात्यातील रक्कम अल्प मुदत ठेवींमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पालिकेच्या ठेवींच्या व्याजावर वर्षाला क ोट्यवधी रुपये मिळत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका ही श्रीमंत महापालिका समजली जाते. या महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न पालिका विविध बँकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचा-यांचे वेतन आणि विकास कामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिके ला मिळणा-या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी लगेच खर्च होत नसल्यामुळे तो विविध बँकांमध्ये दीर्घ मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातो.
पालिका बँकांमध्ये ठेवत असलेल्या मुदत ठेवींमुळे वर्षाला 155 कोटी 83 लाख 13 हजार 727 रूपये व्याज मिळत होते. दररोजचे कोट्यवधींचे उत्पन्न चालू खात्यामध्ये जमा करत असल्याने त्याचा महापालिकेला फायदा होण्याऐवजी संबंधित बँकांचा आर्थिक फायदा होत होता. त्यामुळे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी अल्पमुदत ठेवींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, असा सल्ला दिला.
आजमितीला महापालिकेने विविध बँकांमध्ये एकूण 2 हजार 957 कोटी 92 लाख 81 हजार रुपये अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवले आहे. त्यापोटी गेल्या आर्थिक वर्षात 155 कोटी 83 लाख 13 हजार 727 रुपयांचे व्याज मिळाले होते. यंदा त्यात वाढ होऊन 50 कोटी 11 लाख 88 हजार 132 रुपये वाढीव व्याज मिळाले आहे.
