डिजिटल क्रांती दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली: जगभरातील देशांनी डिजिटल क्रांतीने आपलेसे केले असले तरी सायबर सुरक्षा हा सर्वांत मोठा प्रश्न असून, डिजिटल क्रांती ही दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडू नये असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केले. ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस’ या परिषदेचे उद्घाटन गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
120 देशांमधील सायबर तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, सायबरस्पेस 2017 डिजिटल विश्व दहशतवादी व कट्टरतावाद्यांसाठी मोकळे मैदान ठरू नये, याची जबाबदारी प्रत्येक देशाने घेण्याची गरज आहे. डिजिटल क्रांतीमुळे जग जवळ आले असले, तरी भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन, सायबर सुरक्षेसाठी सर्वंच देशांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
डिजिटल क्षेत्रात भारताची स्पर्धा ही विकसित देशांशी आहे. आयटी क्षेत्रात भारतातील तरुणांनी जगावर छाप पाडली असून, त्यामुळे भारतीय प्रतिभेची सर्वांना ओळख झाली. भारतीय कंपन्यांनी आयटी क्षेत्रात नाव कमावले, असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितले. मोबाईलचा वापर आम्ही नागरिकांना सशक्त करण्यासाठी करत आहोत. यात ‘आधार’चीही मदत घेतली जात आहे.
‘आधार’चा वापर केल्याने लोकांना दरवेळी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, असा दावा त्यांनी केला. जनधन खाते, आधार आणि मोबाईल फोन हे तीन घटक भ्रष्टाचार संपवण्यात आणि पारदर्शक कारभारात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात, असे त्यांनी सांगितले.
शेतकर्यांनाही डिजिटल सुविधा उपलब्ध करुन देत असून, कृषी क्षेत्रातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवत आहोत, असा दावा त्यांनी केला. भारतातील जनता आता कॅशलेस व्यवहारांवर भर देत आहे. भारतीय नागरिक ‘भीम’ अॅपचा वापर करत असून यामुळे भारत विकासाची नवी उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा