माजी मुख्यमंत्री नारायण राणेंचा भाजपनं केला पोपट !
राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हा तसा वाघ माणूस. कामालाही तसाच. बोलका. अंगावर वादळं ओढवून घेणारा. काही राजकीय अडचणीमुळं दादांना पक्षांतर करावं लागलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली; परंतु त्यानंतर शिवसेनेची सत्ता गेली. कोणताही राजकीय पक्ष सत्तेत असतो, तेव्हा तो त्याच्याकडील विविध तपास यंत्रणांना हाताशी धरून मागं चौकशीचं शुक्लकाष्ट लावू शकतो.
दादांसारख्यांच्या बाबतीत तर ते लगेच शक्य होतं. त्यात दादांना सत्तेचा मोठा हव्यास. शिवसेनेची भांडून मिळवायची सवय होती. ती नेत्यांमध्येही पुरेपूर भिनली आहे. शिवसेना सोडली, तरी जुनी सवय जात नाही. मला हेच पद पाहिजे, असा राजकारणात आग्रह धरून चालत नाही; परंतु राणे यांना ते कोण सांगणार ?
शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता होती. त्यासाठी दादांनी वाट पाहायला हवी होती; परंतु कबूल केलेलं मिळलं नाही, की दादा लगेच त्रागा करतात. काँग्रेसमध्ये हायकमांड नावाची अदृश्य शक्ती असते. ती कधी कोपेल आणि कधी प्रसन्न होईल, याचा भरवसा नसतो. शरद पवार यांच्यापासून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी तिचा अनुभव घेतला आहे.
दादांना काँग्रेसमध्ये एक तपाहून अधिक काळ राहूनही त्याचं भान आलं नाही. स्वकीयांविरोधात बंड केलं, तर ते कधी ना कधी अडचणीत आणतील, याचा विचार त्यांनी केलेला नसावा. काँग्रेस भल्या भल्यांना कळली नाही. ती नारायणदादांना कशी कळणार ? देशात व राज्यात सत्तांतर होऊन आता तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये राहिले, तरी त्यांना जे साध्य करायचं आहे, ते साध्य होणर नाही. त्यामुळं त्यांनी काँग्रेस सोडली.
खरं तर त्यांनी तीन वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडली असती, तर ते आज भाजपत असते; परंतु सत्तेचा दुरुपयोग कुठंपर्यंत करता येतो, याचा गृहपाठ मुख्यमंत्री राहिलेल्या दादांना करता आला नाही. त्यामुळं ज्यांची क्षमता मुख्यमंत्री होण्याची आहे, त्या दादांना आता मंत्रिपदासाठी झगडावं लागतं आहे, हा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. नारायण राणे यांची राजकीय ताकद बर्यापैकी कमी झाली आहे.
त्यांना मुलांचं राजकारण, ईडीच्या चौकशा टाळणं आणि वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी आणणं हे तीनच महत्त्त्वाचे विषय वाटतात. त्यामुळं एकेकाळच्या या वाघाचं रुपांतर दयेची याचना करणार्यांत झालं आहे. दादांचा भाजपत जाण्याचा प्रयत्न होता. दादांनी त्यासाठी भाजपकडं भरपूर प्रयत्न केले. भाजपनं ही दादांना झुलवत ठेवलं. भाजपची चाणक्यनीती दादांच्या लक्षातच आली नाही.
राणे यांच्यासारखा महत्त्वाकांक्षी नेता भाजपत आला, तर तो कधीही आपल्या खुर्चीखाली सुरुंग लावू शकतो, अशी भीती भाजपायी नेत्यांना वाटत होती. त्यामुळं तर राणे भाजपत येऊ नये, अशी व्यूहरचना भाजपनं केली होती. तिला यश आलं. राणे यांना भाजपत घ्यायचं तर नाही; परंतु त्यांच्या उपद्रवमूल्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा, ही भाजपची चाणक्यनीती आहे. राणे आक्रमक आहेत.
त्यांच्या या आक्रमकतेचा वापर शिवसेनेला शह द्यायचा, असा भाजपचा प्रयत्न आहे. राणे यांना भाजपत घेतले, तर शिवसेनेची खप्पामर्जी होईल, त्यामुळं राणे यांना नवीन पक्ष काढण्याचा सल्लाही भाजपनंच दिला. राणे यांनी पक्षत्याग करताना विधान परिषद सदस्यत्त्वाचा त्याग केला. राणे यांच्या नव्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षालाच ती जागा भाजपनं द्यायला हवी होती.
राणे यांच्यामुळं उपकृत झालेले महाराष्ट्रात सर्वपक्षीय आमदार आहेत. आमदारांतून विधान परिषदेची निवडणूक होणार असल्यानं आणि ती गुप्त असल्यानं अनेक मतं फुटण्याची शक्यता होती. भाजपच्या आमदारांची संख्या आणि अपक्षांची बेरीज केली, तर राणे यांना आठ-नऊ मतं मिळवणं फारसं अवघड नव्हतं; परंतु भाजपला राणे यांच्यापेक्षाही गुजरातच्या निवडणुकीची जास्त चिंता असल्यानं भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही.
दादांनी विधान परिषदेची निवडणूक लढविण्याची पुरेपूर तयारी केली होती; परंतु आता भाजपनंच कच खाल्ली. शिवसेनेनं राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला तसंच त्यांना युतीचे उमेदवार म्हणून स्वीकारायला विरोध केला आहे. दादांना राजीनाम्यानंतर मंत्रिपद देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादांनी दिलं.
वारंवार त्याबाबत जाहीर वक्तव्य केलं. चंद्रकांतदादांनी दादांसाठी स्वत: कडील मंत्रिपद त्यागण्याची तयारी दाखविली; परंतु नंतर कोलांटउडी मारली, हा भाग वेगळा. देशातील सध्याचं वातावरण पाहून भाजपला धडा शिकविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली चालू झाल्या होत्या. या तीनही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बेरीज दीडशेहून अधिक होते.
काही अपक्षही या तीन पक्षांच्या गळाला लागतील, अशी भीती भाजपला होती. दादा उमेदवार नसतील, तर शिवसेना व भाजप निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे. या दोन्ही पक्षांच्या आमदारांची एकत्रित बेरीज 186 होते. त्यामुळं भाजपनं राणे यांना पुन्हा झुलवत ठेवलं आहे. अगोदर मंत्रिपदासाठी आणि आता आमदारकीसाठी! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि चंद्रकांतदादा यांच्यात दीड तास चर्चा झाली.
शिवसेनेच्या विरोधामुळं विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी दादांचा पर्याय डावलून पक्षातलाच उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, भविष्यात राणेंना मंत्रिमंडळात कधीच घेणार नाही, याबाबत आताच भूमिका स्पष्ट करता येणार नाही, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे. भाजपनं दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन निर्णय कळवू, असं उद्धव यांनी स्पष्ट केलं आहे.
सात डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.27 नोव्हेंबरला पोट निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात कोणाची राजकीय समीकरणं जुळतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. राणेंच्या उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. मात्र, आता भाजपनं आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे.
यामध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, शायना एनसी आणि प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या सहमतीनंच भाजप उमेदवार ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नारायण राणेंऐवजी इतरांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. पुढच्या काळातील पोटनिवडणुकीत दादांना विधानपरिषदेत पाठवलं जाऊ शकतं; पण त्यामुळं राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.