Breaking News

चंद्रकांत दादांचा प्रवास भुजबळांच्या मार्गावर..पण कुठपर्यंत?

भ्रष्ट अभियंत्यांना गजाआड करण्याचा आ.वाघमारेंचा निर्धार.


विद्यमान सरकार विशेषतः सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा कारभार लोकशाही आघाडी सरकारच्या कारभारापेक्षा वेगळा नाही. आजी माजी साबां मंत्र्यांची कार्यशैली एकच असून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन हा एक कलमी कार्यक्रम आहे तसाच राबविला जात असल्याची टीका या तुलनेतून जोर धरू लागली आहे. शहर इलाखा शाखेतील पाच कोटीच्या अपहाराचा ठपका ठेवलेल्या कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांच्या पाठीशी विद्यमान साबां मंत्री ठाम उभे राहील्याने त्यांच्यावर संशयाच्या नजरा खिळल्या आहेत. 

सार्वजनिक बांधकाम खात्यात तब्बल पंधरा हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप करून लोकशाही आघाडी सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना तेंव्हाचे विरोधक भाजपेयींनी कोंडीत पकडून सळो की पळो करून सोडले होते. सत्तेवर आल्यानंतर भुजबळ यांना चौकशीसाठी अटक करून या क्षणापर्यंत बंदीस्त ठेवले. त्या पंधरा हजार कोटीपैकी एकाही आरोपांची चौकशी तर झाली नाहीच उलट महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आरोपपत्रही या मंडळींना अद्याप दाखल करता आले नाही. 

भुजबळ यांच्यावर जे आरोप झाले तेच आरोप विद्यमान साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर होऊ लागले आहेत. मर्जीतील कंत्राटदारांना निविदा वाटप करणे, कामाचे तुकडे पाडणार्‍या अभियंत्यांना पाठीशी घालणे, मंजूरी न घेता, अंदाजपत्रकात नमूद नसलेली कामे करणे, बोगस दस्त तयार करणे, मोजमाप पुस्तिकेत खोट्या नोंदी करणे, बोगस बीले मंजूर करून देयके बेकायदेशीर अदा करणे अशा विविध मार्गाने कोट्यवधी रूपयांचा अपहार करणार्‍या अभियंत्यांना दोषी आढळूनही चंद्रकात दादा पाटील संरक्षण देत असल्याचा आरोप होत आहे. भुजबळ यांच्यावर यापेक्षा वेगळे कोणते आरोप होते? असा सवाल चंद्रकांत दादा पाटील यांच्या कार्यशैलीवर उपस्थित केला जात आहे. 

 भुजबळ यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी आरोप केले होते. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर स्वपक्षाचे आमदार आरोप करीत असूनही त्याची दखल घेतली जात नाही. इतके निर्ढावलेले मंत्री साबांचे कल्याण करण्याचा विचार कसा करणार असाही एक उपप्रश्‍न विचारला जातो आहे. भाजपचे तुमसर मतदार संघाचे आ.चरणभाऊ वाघमारे हे गेल्या काही महिन्यांपासून साबांतील भ्रष्टाचाराविरूध्द आवाज उठवित आहेत. 

अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, सचिव, साबां मंत्री या सर्व पातळीवर आ.वाघमारे यांनी शहर इलाखा शाखेतील आमदार मनोरा निवास इमारतीच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा केला. या साखळीतील सारेच दुवे भ्रष्टाचाराला पाठीशी घालू लागल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना साकडे घालून या प्रकरणाची अधिक्षक अभियंत्यांमार्फत चौकशी करवून घेतली. या चौकशीत दोषी आढळलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता, आणि सह अभियंत्यांवर गंभीर कलमाखाली फौजदारी गुन्हा दाखल होईल इतका हा गुन्हा गंभीर असतानाही साबां मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे गुन्ह्याची अपेक्षा फोल ठरली. 

साबां मंत्री एका बाजूला भ्रष्ट कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या पाठीमागे खंबीर उभे ठाकले असतांना दुसर्‍या बाजूला आ.चरणभाऊ वाघमारे यांनीही या भ्रष्ट अभियंत्यांना गजाआड करण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. प्रशासन गुन्हा दाखल करीत नाही. म्हणून स्वतः आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आ. चरणभाऊंनी तयारी केली आहे. त्यासाठीही परवानगी मिळत नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून आ. चरण भाऊ वाघमारे यांनी मागील महिन्यात परवानगीसाठी प्रधान सचिवांना विनंती पत्र दिले. 

या पत्रावर आठ नोव्हेंबरला कार्यवाही करून प्रधान सचिव कार्यालयाने सदर परवानगीसाठी साबां मंत्र्यांना नस्ती सादर केली आहे. या घटनेला सोळा दिवस उलटूनही साबां मंत्र्यांकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. या सर्व घडामोडीतून छगन भुजबळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून चंद्रकांत दादांच्या साबां कारभाराचा प्रवास सुरू असल्याचे दिसते आहे. दादा या भुजबळांच्या या मार्गावर आणखी किती अंतर चालणार हे पहाणे आगामी काळातील औत्सूक्य ठरू शकते. मात्र आ.चरणभाऊ वाघमारे यांनी हे प्रकरण तडीस नेऊन दोषींना गजाआड करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा