संसदीय अधिवेशन 15 डिसेंबरपासून .
नवी दिल्ली/प्रतिनिधी : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला येत्या 15 डिसेंबरपासून प्रारंभ केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस़र्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानानंतर एक दिवसाने हे अधिवेशन सुरू होणार आहे.
गुजरात निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांनाही प्रचारासाठी वेळ आणि संधी उपलब्ध व्हावी, यासाठी आधिवेशन मतदानानंतर सुरू करण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण नंतर देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. सर्वसाधारणपणे निवडणूक प्रचाराचा कालावधी आणि आधिवेशन कालावधी एकमेकांना छेद देतील अशाप्रकारे योजना न करण्याची परंपरा आहे.
सरकारने या परंपरेचे पालन केले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. अधिवेशन जानेवारीतही सुरू राहिले तर ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाशिवायच होईल काय, या प्रश्नालाही जेटली यांनी समर्पक उत्तर दिले. नियमानुसार कोणत्याही नव्या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होतो. पण डिसेंबरमध्ये सुरू झालेले अधिवेशन जानेवारीत म्हणजे नव्या वर्षातही सुरू राहिले तर ते नव्या वर्षाचे पहिले अधिवेशन समजले जात नाही. त्यामुळे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा प्रश्न उद्भवत नाही, असा खुलासा त्यांनी यावेळी केला.