Breaking News

बायर कंपनीच्या चर्चासत्रात 200 शेतकर्‍यांना विषबाधा

दिंडोरी, दि. 10, नोव्हेबर - नाशिक - पेठ रस्त्यावरळे बुद्रुक येथे बायर कंपनीच्या चर्चासत्रादरम्यान शेतकर्‍यांना दिलेल्या स्नेहभोजनातून 200 शेतकर्‍यांना विषबाधा झाल्याची  घटना घडली आहे.यात एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून अन्य तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. इतर विषबाधित शेतकर्‍यांना दिंडोरी व नाशिक येथील खासगी तसेच  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
विषबाधा नेमकी कशामुळे झाली याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. या घटनेतील मृत शेतकर्‍याचे नाव अतुल केदार आहे. अल्पोपहारानंतर शेतकर्‍यांना अस्वस्थ वाटू लागले.  तेव्हा विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेतकर्‍यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. बायर कंपनीकडून उमराळे बुद्रुक येथे संकरित टोमॅटो- US1143 या वाणाच्या पीक पाहणीचा कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन काल करण्यात आले होते. यात कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रम संपल्यानंतर कंपनीच्या वतीने शेतकर्‍यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास या चर्चासत्रात उपस्थित 200 शेतकर्‍यांनी याठिकाणी भोजन के ले.भोजनानंतर एक-एक करत सर्वच शेतकर्‍यांना अस्वस्थ वाटू लागले. काहींची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांना ताबडतोब जिल्हा रुग्णालय तसेच दिंडोरी येथील उपजिल्हा  रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यात अतुल केदारे नामक शेतकर्‍याचा मृत्यू झाला. तर इतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात असून त्यांच्यावर  शेतकर्‍यांवर उपचार सुरु आहेत. विषबाधेचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद गटनेते माजी आमदार धनराज महाले यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून  उपचाराबाबत माहिती घेतली.