Breaking News

बेलगंगा साखर कारखान्यातील कर्मचार्‍यांच्या पी.एफ.साठी 11 कोटी वर्ग

जळगाव, दि. 10, नोव्हेबर - चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखान्याच्या लिलावात भरलेल्या 40 कोटी रुपयांमधून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये कर्मचा-यांच्या  भविषनिर्वाह निधीसाठी अकरा कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष चित्रसेन पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
बेलगंगा साखर कारखाना जिल्हा बँकेकडून लिलाव प्रक्रियेद्वारे लोकसहभागातून विकत घेतल्यानंतर कामगारांचा पीएफ, थकीत वेतन याबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला होता. बँकेने  पीएफचे पैसे भरावे यासाठी कामगारांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करुन लढा सुरु ठेवला आहे. न्यायालयाने बँकेला कामगारांच्या पीएफचे अकरा कोटी रुपये  भरण्याबाबत निर्देश दिल्यानंतर लिलावाच्या 40 कोटी रुपयांमधून अकरा कोटी रुपये अनामत म्हणून भरले गेले आहेत. यामुळे कामगारांच्या पीएफची देणी मिळण्याचा मार्ग मोकळा  झाला असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
ही प्रक्रिया 1 नोव्हेंबरला पार पडली असून, यामुळे कामगारांच्या पीएफला सुरक्षा मिळाली आहे. 12 नोव्हेंबरला केडीओ हॉलमध्ये सकाळी 11 वाजता कामगारांसाठी बैठक आयोजित  करुन त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. कामगारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चित्रसेन पाटील यांनी दिली.