Breaking News

अधिक आवाज करणार्‍या फटाक्यांच्या विक्रीवर बंदी

नाशिक, दि. 04, ऑक्टोबर - दिवाळी व इतर सणाच्यावेळी ध्वनी व हवाप्रदूषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शहर पोलिस आयुक्त  रवींद्रकुमार सिंगल यांनी 6 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत नियम व सुधरित नियम 89 अन्वये मनाई आदेश जारी केले  आहेत. त्यानुसार फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणार्‍या फटाक्यांच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी  घातली आहे.
नागरीकांनी फटाके गर्दीचे ठिकाणी न उडविता मोकळ्या जागेत जेथे वस्ती व वर्दळ नाही अशा ठिकाणी उडवावेत. साखळी फटकाक्यांची आवाज मर्यादा चार मीटर  अंतरापर्यंत 115 डेसीबलपेक्षा जास्त नसावी. शांतता क्षेत्रात रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये इत्यादींच्या सभोवतालचे 100 मिटरचे क्षेत्र तसेच पेट्रोलपंप,  केरोसिन, इत्यादी ज्वालाग्राही पदार्थाचा साठा व विक्री करण्याचे ठिकाणापासून 100 मिटर परिसरात कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ  नये. फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापराच्या जागेपासून 4 मिटर अंतरापर्यत फटाके उडविण्यास बंदी घालण्यात येत आहे.
रात्री 10 वाजेपासून सकाळी 6.00 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी आहे. फटाक्यांची दुकाने जमिनीलगत असावी. परवानाप्राप्त  प्रत्येक स्टॉलमध्ये 100 कि.ग्रॅ. फटाके व 500 कि.ग्रॅ. शोभेचे फटाके यापेक्षा जास्त साठा असणार नाही. प्रत्येक स्टॉलमधील अंतर 3 मीटरपेक्षा जास्त नसावे.  स्टॉलच्या ठिकाणी मेणबत्ती व तेलाचा दिव्यास अनुमती नाही. आपत्तीला तोंड देण्यासाठी सुरक्षा व्यवस्था व अग्निप्रतिबंध उपाययोजना केलेली असावी. आपटबार व  उखळी दारु उडविण्यास मनाई आहे. उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे परदेशी फटाके बाळगू नये किंवा त्यांची विक्री करू नये. 10 हजार फटाक्यांपेक्षा जास्त लांबीच्या  फटाक्यांच्या माळेवर बंदी आहे.
किरकोळ फटाके तयार करणे व विक्री करण्यास देखील हे नियम लागू आहे. मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 33(1)(यु) नुसार वरील आदेशाचा भंग करणारी व्यक्ती  कलम 131 (ख)(1) अन्वये आठ दिवस कारावास व 1250 रुपये द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहील, असे या आदेशात नमुद केले आहे.