Breaking News

सांगलीत सात पिस्तुलांसह 27 जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक

सांगली, दि. 04, ऑक्टोबर - परराज्यातून देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन शहरात विक्रीसाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण  विभागाच्या पोलिस पथकाने सोमवारी मध्यरात्री सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तुले व 27 जिवंत काडतुसे असा तीन लाख 55  हजार 400 रूपये किंमतीचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. या पत्रकार  बैठकीस अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजन माने हेही उपस्थित होते.
अटक करण्यात आलेल्यात सनीदेव प्रभाकर खोत (वय 20, रा. सिंधु बुद्रुक, दहीवडी, ता. माण, जि. सातारा) व संतोष शिवाजी कुंभार (वय 27, रा. नागझरी,  ता. कोरेगाव, जि. सातारा) या दोघांचा समावेश आहे. परराज्यातून देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन त्याची सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यात विक्री करणार्या  टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले असून हे दोघेही पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आले आहेत.
राजन माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण शिंदे, अशोक डगळे, सचिन सावंत, जितेंद्र जाधव, शशिकांत जाधव, सचिन कनप, अझहर पिरजादे व  अरूण सोकटे यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली. या धाडसी कामगिरीबाबत या पोलिस पथकाला रोख 15 हजार रूपयांचे पारितोषिक दत्तात्रय शिंदे यांनी  जाहीर केले.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच देशी बनावटीच्या पिस्तुलाची विक्री करणार्या टोळीस अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही  सर्वात मोठी कारवाई असून संबंधितांनी ही शस्त्रे कोठून आणली? व ती सांगली येथे कोणाला विकायला आले होते? याची चौकशी केली जात आहे. या शस्त्र  तस्करीमागे मोठी टोळी कार्यरत असून सांगली शहरातील काही गुन्हेगारांच्या संपर्कात असल्यानेच ते इतक्या निर्धास्तपणे शस्त्र तस्करीसाठी आले असावेत, अशी  शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्ह्यातील दोघेजण देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी सांगली शहरात येणार असल्याची माहिती राजन माने यांना मिळाली होती. या माहितीआधारे  त्यांच्या नेतृत्वाखाली या पोलिस पथकाने सांगली शहरातील शंभर ङ्गुटी रस्त्यावरील हॉटेल जय मल्हार परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला  होता. त्यावेळी शंभर फुटी रस्त्यावर दोघेजण संशयास्पदरित्या ङ्गिरत असल्याचे आढळून आले. या दोघांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडील  एका पिशवीत देशी बनावटीची सात पिस्तुले व 27 जीवंत काडतुसे मिळून आली. या दोघांविरोधात बेकायदा हत्यार बाळगणे व तस्करीप्रकरणी विश्रामबाग पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास प्रविण शिंदे करीत आहेत.