Breaking News

एसटीच्या अधिकार्‍यांच्या आश्‍वासनानंतर वृत्तपत्र विक्रेत्यांचे उपोषण स्थगित

अहमदनगर, दि. 03, ऑक्टोबर - पाथर्डी शहरातील वृत्तपत्र विक्रेते तसेच इतर व्यावसायिक यांनी आपल्या मागण्यांसाठी एसटी आगारसमोर सुरू केलेले उपोषण  अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर स्थगित केले. 
याप्रकरणी प्रमुख वृत्तपत्र विक्रेते विश्‍वनाथ जोशी यांनी सांगितले की पाथर्डी शहरातील जुन्या बस स्थानकावरील  अधिकृत स्टाल परवाना धारकांना कुठलीही  पुर्वसूचना न देता राष्ट्रीय महामार्ग विभागाचया पथकाने अतिक्रमण मोहीम राबविताना विक्रेते, स्टॉलधारक यांचे स्टॉल उद्धवस्त केले. मात्र कारवाईनंतर दीड महिना  उलटूनही स्टॉलधारकांना पाथर्डी आगाराने नवीन जागा उपलब्ध करून न दिल्याने आज उपोषण करण्यात आले होते. परंतु एसटी आगारप्रमुख अन्सार शेख यांनी  वरिष्ठांशी चर्चा करून तातडीने जागा उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आश्‍वासन दिल्याने आम्ही उपोषण स्थगित करीत आहोत, मात्र प्रश्‍न सुटला नाहीतर पुन्हा  उपोषण करण्याचा इशारा जोशी यांनी दिला.
या प्रसंगी लोकमंथनचे निवासी संपादक कैलास ढोले, सामाजिक कार्यकर्ते सुनील पाखरे  यांनी आगार प्रमुख शेख व  उपोषणकर्ते यांच्यात चर्चा घडवून आणली.शेख  यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून विभाग नियंत्रक नितीन मैंध यांचेसी  मोबाईलवरून चर्चा घडवून आणली.यावेळी आगारातील अधिकारी अण्णा आंधळे उपस्थित  होते.राष्ट्रीय महामार्ग रोडचे काम  चालू असून त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण दीड महिन्यापूर्वी पाडण्यात आले होते.  स्टॅल धारकांनी  एस.टी. महामंडळा बरोबर चौदा वर्षांचा करार केला आहे.