Breaking News

निवडणूकीच्या कामाच्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या कर्मचार्‍यांना नोटीसा

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : सातारा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर 833 मतदान अधिकारी तसेच कर्मचार्‍यांसाठी घेतलेल्या प्रशिक्षणासाठी 33 जण गैरहजर राहिले. सातारा तहसीलदारांनी या दांडीबहाद्दर कर्मचार्‍यांना कारवाईची इशारा नोटीस काढली असून त्यांच्याकडून 24 तासात खुलासा मागवला आहे.
जिल्ह्यासह सातारा तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरु आहे. या निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनही कसोशीने प्रयत्न करत आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांचे प्रशिक्षणही गुरुवारी घेण्यात आले. सातारा तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींसाठी दि. 16 रोजी मतदान होत आहे. या निवडणुका सुरळीत होण्यासाठी तालुक्यातून 833 अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची व्यवस्था केली आहे. त्यांच्यासाठी सातारा येथे शाहू कला मंदिर याठिकाणी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्याबाबत 4 दिवसांपूर्वी तहसीलदार कार्यालयाने संबंधितांना प्रशिक्षणास उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र 33 जण प्रशिक्षणाला गैरहजर राहिले. त्यामुळे दांडीबहाद्दरांना तहसील कार्यालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्रशिक्षणास अनुपस्थित असल्याबाबत 24 तासांत लेखी खुलासा मागवला आहे. समाधानकारक खुलासा नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा तहसील कार्यालयाने दिला आहे. दरम्यान, निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा सातारा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या उपस्थितीत मतदान अधिकारी तसेच कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण शिबिर झाले. या शिबिरात मतदान यंत्रे हाताळणे मतदान यंत्रे सील करणे, मतदान केंद्रावर घ्यायची काळजी आदि सूचना नीलप्रसाद चव्हाण यांनी केल्या. निवडणुकीची माहिती देणारी पुस्तिकाही यावेळी संबंधितांना वाटण्यात आल्या. पहिल्यांदाच सरपंच निवड थेट होत असल्याने त्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रोजेक्टरच्या माध्यमातून तहसीलदार चव्हाण यांनी मतदान अधिकार्‍यांच्या शंकांचे निरसन केले. प्रशिक्षण शिबीरासाठी सातारा तालुका भूमि अभिलेख उपअधिक्षक बाळासाहेब भोसले, नायब तहसीलदार जयंत वीर उपस्थित होते.