Breaking News

सातारा जिल्हा परिषदेचे 34 कोटी 49 लाखाचे पुरवणी बजेट मंजूर

सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या 34 कोटी 49 लाख 32 हजार रुपयांच्या पुरवणी बजेटला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. हे बजेट जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार यांनी सभागृहात मांडले. यामध्ये विविध त्रुटीवरुन बहुतांशी सदस्यांनी मुख्य लेखापाल पाटील यांना फैलावर घेतले. 
जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
शिक्षण अर्थ समितीचे सभापती राजेश पवार यांनी 34 कोटी 49 लाख 32 हजार रुपयांचे पुरवणी बजेट सभागृहात मांडले. त्यावर विश्‍लेषण करताना मुख्य लेखापाल पाटील यांनी मुळ बजेट 29 कोटी 95 लाख 55 हजाराचे होते. 34 कोटी 59 लाख 32 हजार एवढी रक्कम अखर्चीत राहिली होती. असे सांगताच, दीपक पवार यांनी ती रक्कम का राहिली आणि कुठे होती?, असा सवाल करताच, पाटील यांनी जिल्हा बँकेच्या खात्यावर होती. जिल्हा बँक किती व्याज देते आणि राष्ट्रीयकृत बँक किती व्याज मिळाले असा सवाल केला. पाटील यांनी व्याजाचा दर सांगताच, उपाध्यक्ष मानकुमरे यांनी जिल्हा बँक चांगले व्याज देते. अध्यक्षांनी 12 कोटी 4 लाख व्याजाच्या सेसमधून मिळाल्याचे सांगितले. दीपक पवार यांनी शेती विभागाला कमी पैसे दिले आहेत. शेतीसाठी गरज होती. 1 कोटी रुपये वाढवण्याची मागणी केली. दीपक पवार यांनी पाच महिने अखर्चित रक्कम जिल्हा बँकेत पडून राहिली. एवढे दिवस का लागले?, राष्ट्रीयकृत बँकेत व्याजदर ज्यादा मिळाला असता, या मुद्यावरुन तर सुरेंद्र गुदगे यांनी त्रिशंकू  भागातून मुद्रांक शुल्क घेतले जातात, पण सुविधांसाठी निधीच काय?, तरतूद का केली नाही?, पशुसंवर्धन टेक्निशयनसाठी तरतूद नाही. जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांच्या कर्जाच्या थकबाकीची वसुली करा अशा मुद्यावरुन मुख्य लेखापाल यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. दरम्यान, सातारा शहर हद्दवाढीच्या प्रश्‍नांवरुन दीपक पवार यांनी पंचायत समितीच्या सभेत जे ठराव झाले त्यास पाठिंबा असल्याचे मत मांडले. खटावचे सभापती संदीप मांढवे यांनी कुस्तीगीर परिषदेंसाठी 10 लाख रुपयांची तर दरवर्षी होणार्‍या कुस्ती सामन्यासाठी जिल्हा परिषदेने 1 लाख रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली. अर्चना देशमुख यांनी प्रतापसिंह हायस्कूलवर तर रेश्मा शिंदे यांनी महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथीसाठी कमी निधी असल्याचा मुद्दा उपस्थित केला.