Breaking News

लोकसंग्राहक...वादळ कायमचं शांत

दि. 23, ऑक्टोबर - कुंडलिकराव जगताप...सर्वांचे तात्या. करारी बाण्याचा माणूस. पाटलाच्या घरात जन्मा झालेला, तरी घरी अठरा विश्‍व दारिद्र्य. स्वभाव मुळात बंडखोर. अन्यायाविरोधात लढण्याची उमेद लहानपणापासूनच. नगरला महाविद्यालयात असतानाच विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी रस्त्यावर आलेला युवक. त्यांची बोलण्याची ढब आगळी वेगळी. लोकांची नस कळणारा हा युवक. ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी गेलेल्या युवकांना घरातून एसटीनं डबे पाठविले जात. ते अचानक बंद करण्यात आले. त्याविरुद्धही त्यांनी आंदोलन छेडलं. डबे पूर्ववत चालू ठेवायला भाग पाडलं. केवळ आंदोलन करण्यापुरतं त्यांचं नेतृत्त्व मर्यादित नव्हतं. नगरला असतानाच त्यांची साहित्यिकांत उठबस होती. त्यांचं वाचनही चांगलं होतं. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या ते जवळ जाण्यातही दोघांची समान आवड हे कारण होतं. त्यांच्यावर सुरुवातीला डाव्या विचारांचा प्रभाव होता. त्यांचं  आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे अडचण असली, तर शांत राहायचं. एकदा ती संपली, की पुन्हा नव्या जोमात आणि आक्रमकतेच्या भूमिकेत यायचं. वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं जमविणं, त्यांच्यांशी गप्पा मारणं, हास्यविनोद करणं त्यांना चांगलंच जमायचं. नगरमधील एका सभेत त्यांनी केलेल्या भाषणानं तत्कालीन केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे हे ही प्रभावित झाले होते. अण्णासाहेब ही मूळचे डाव्या विचारांचे. त्यांनी कुंडलिकरावांना काँग्रेसमध्ये आणलं. एखाद्याचं नशीबच असं असतं, की संधी अनेकदा हुलकावणी देते, तर कधी मिळाली, तर तिचं सोनं होत नाही. कुंडलिकरावांना तो अनुभव वारंवार आला. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघ प्रदीर्घ काळानंतर खुला झाला. अनेकांच्या आशा पालवल्या. अण्णासाहेबांनी कुंड़लिकरावांसाठी उमेदवारी आणली. एबी फॉर्मही त्यांच्याकडं दिला. एबी फॉर्म घेऊन ते मोटारसायकलवरून श्रीगोंद्याकडं निघाले; परंतु वसंतदादा पाटलांनी उमेदवारीत अचानक बदल केला. शिवाजीराव नागवडे यांना उमेदवारी दिली. तात्यांना नगरला बोलवून एबी फॉर्म परत दिला. तेव्हापासून तीनदा त्यांना आमदारकीनं हुलकावणी दिली.
विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नावाची चर्चा होई. शरद पवार यांना श्रीगोंद्यात प्रचारासाठी आणलेला पहिला नेता म्हणूनही त्यांची ओळख. समाजवादी काँग्रेसचे ते उमेदवार होते. पवार यांच्या त्यांच्यासाठी दोन सभा ठरलेल्या. त्यानंतर नगरचा दौरा. पवार यांची एक सभा पार पडली. ते नगरला निघाले; परंतु जोरदार पावसानं त्यांची वाटच बंद केली. अचानक पवार माघारी फिरले. तात्यांकडंच मुक्काम करण्याचं ठरलं. त्या काळात गेस्ट हाऊस, फर्निचर असं काहीच नव्हतं. तात्यांनी दवंडी फिरवून ज्याच्या घरात जे आहे, ते मागविलं. पवार यांच्यासह अधिकार्‍यांनी हातात भाजी, भाकरी घेऊन खाल्ली. जिल्हा परिषदेत अगोदर स्वीकृत सदस्य व नंतर निवडून आलेला सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. तालुक्याच्या प्रश्‍नांची चांगली जाण असलेला आणि प्रशासनावर चांगलीच पकड असलेला नेता म्हणून त्यांची श्रीगोंदे पंचायत समितीच्या इतिहासात नोंद झाली. बाबासाहेब भोस या आपल्याच शिष्याच्या विरोधात भूूमिका घ्यावी लागली, तरी ते मागं हटले नाहीत. श्रीगोंद्यात झालेली राजकीय दंगल ही त्याची साक्ष. जिल्हा परिषदेच्या कामकाजावरही त्यांचा ठसा उमटलेला. रोखठोक बोलण्यातही त्यांचा हात कुणी धरू शकलं नाही. कुकडी कालवे निघाल्यानं दुष्काळी भाग पाण्याखाली आला. श्रीगोंदे आणि बेलवंडी श्ाुगर असे दोन कारखाने होते. बेलवंडी बंद पडला. बबनराव पाचपुते यांनी खासगी कारखानदाराची वाट धरली; परंतु तात्या कामयच सहकाराचे समर्थक राहिलेले. सत्तेचा चांगल्या कामासाठी वापर कसा करून घ्यायचा, हे शिकावं  ते त्यांच्याकडूनच. कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचं स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यासाठी वारंवार रस्त्यावर आले. आंदोलनं केली. कुकडी हाच पक्ष मानून त्यांनी तो उभारेपर्यंत जे जे सत्तेत होते, त्यांच्यांशी जवळीक ठेवली. गडाख यांचं त्यांना मार्गदर्शन होतंच. कुकडी कारखाना काढतानाही त्यात सहवीजनिर्मितीसह अन्य उपपदार्थ निर्मिती प्रकल्प असतील, याची काळजी त्यांनी घेतली. कुकडी चालविण्यातही त्यांचं व्यवस्थापन कौशल्य दिसलं. जिल्ह्यात सर्वांधिक साखर उतारा असलेला कारखाना हा नावलौकिक त्यांनी मिळवून दिला. सर्वांधिक भाव देण्यातही त्यांनी आघाडी घेतली.
साखर कारखानदारी, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम सुरूच असताना त्यांनी श्रीगोंद्याच्या पाणी प्रश्‍नावर केलेलं काम कधीच विसरता येणार नाही. हंगा नदीवर बांधलेला जलसेतू, कुकडीच्या कार्यक्षेत्रात झालेली जलसंधारणाची कामं, रस्ते याबाबतीतील त्यांचं योगदान ही मोठं होतं. बबनराव पाचपुते हे श्रीगोेंदे तालुक्यातील सर्वांचे राजकीय विरोधक; परंतु त्यांच्या विरोधकांत एकवाक्यता होत नव्हती. सर्वांनाच आमदार होण्याची घाई झालेली. त्यामुळं बबनरावांचं फावत होतं. कुंडलिकरावांंना आमदारकीनं सातत्यानं हुलकावणी दिलेली. बबनरावांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी दहा वर्षांपूर्वी भाजपशी संधान बांधलं; परंतु खासदार रुपा निलंगेकर यांच्या माध्यमातून ती उमेदवारी ऐनवेळी राजेंद्र नागवडे यांना मिळाली. पाचपुते पुन्हा विजयी झाले. गेल्या निवडणुकीत मात्र पाचपुते विरोधकांची मोट बांधण्यात तात्यांना यश आलं. पवार यांनी त्यांना मदत केली. राहुल जगताप यांना उमेदवारी मिळाली. पाचपुते यांचा पराभव करून त्यांना निवडून आणण्यात तात्यांना यश आलं. आमदार होता आलं नाही, तरी आमदाराचा बाप होता आलं. याचा आनंद त्यांना होता. गेल्या दहा वर्षांपासून मधुमेहानं ते त्रस्त होते. तरीही त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती; परंतु उपचार चालू असतानाच त्यांचं निधन झालं. श्रीगोंद्याचा राजकीय इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा कुंडलिकरावांना वगळता येणार नाही, एवढं त्यांचं गेल्या साडेतीन दशकातलं योगदान आहे. पत्रकारांचे ते सच्चे मित्र होते.