Breaking News

लाडसाब अनंताच्या प्रवासाला गेले.....पण!

कुमार कडलग/नाशिक, दि. 29, ऑक्टोबर - गेल्या दोन दशकातील राष्ट्रीय गंगाजळीसह देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट दुष्परिणाम करणार्या दोन महाघोटाळ्यांचे मुख्य सुञधार हर्षद  मेहता आणि अब्दूल करीम तेलगी यांच्या मृत्यू नंतर हे घोटाळे पुर्णतः विस्मरणात गेले.हर्षद मेहताची आठवणही कुणाला येत नाही.तेलगीचा मृत्यू ताजा ताजा असल्याने या  घोटाळ्याच्या काही कटू आठवणी जागवल्या जात आहेत. प्रश्‍न या घोटाळ्यांच्या सुञधारांच्या मृत्यूचा नाही  ,तर देशाच्या अर्थव्यवस्थेला छिद्र ,भोक नव्हे तर भगदाड पाडणार्या या  गंभीर घटनांमधून राष्ट्र हिताला झालेले नुकसान भरून काढले जाते का? हा आहे.
तेलगीचा मृत्यू ताजा असल्याने या घोटाळ्याचा आढावा घेत असतांना राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला समांतर अर्थव्यवस्था उभी करण्याचे हे षडयंञ उघड झाल्या नंतर देशाची यंञणा  खडबडून जागी झाली असे म्हटले जाते.इथेच खरा आक्षेप नोंदविला जायला हवा.अब्दूल करीम तेलगी ही एक सामान्य व्यक्ती महाकाय देशाच्या अर्थव्यवस्थेला एकट्याच्या बळावर  आव्हान देऊ शकते असे गृहीत धरून झालेला तपास हाच एका मोठ्या पडयंञाचा भाग आहे.तेलगीने केलेला हा मुद्रांक घोटाळा तेहतीस ते छत्तीस हजार कोटींचा असल्याचे सांगीतले  जाते.तत्कालीन तपास यंञणेने केलेला तपास आणि त्यातून काढलेल्या निष्कर्षावर हा आकडा आधारीत आहे.याचाच अर्थ तपास यंञणेच्या नजरेतून सुटलेल्या किंबहूना नजरेआड के लेल्या अनेक घडामोडी दुर्लक्षित झाल्याची शक्यता गृहीत धरली तर या घोटाळ्याची व्याप्ती उपलब्ध आकडेवारीपेक्षा मोठी असल्याची शक्यता गृहीत धरता येईल.
प्रश्‍न घोटाळ्याच्या आकडेवारीचाही नाही,तर घोटाळ्याने कोणते क्षेञ व्यापले आहे,किती क्षेञ व्यापले आहे? या क्षेञात एव्हढा मोठा घोटाळा करण्याची ताकद एकट्या व्यक्तीकडे असू  शकते का?  हे प्रश्‍न निर्माण करून कुठल्याच घोटाळ्याचा तपास करण्याची मानसिकता आपल्या तपास यंञणा का दाखवित नाहीत हा आहे.
तेलगी घोटाळ्याचा विचार करायचा झाला तर,या घोटाळ्याची सुरूवात नाशिकमधून झाली.सुरूवातीला तेलगीने नाशिकरोड परिसरातील इंडीया सिक्यूरीटी प्रेसमधील काही मंडळींशी  संधान साधून या ठिकाणी छपाई झालेले मुद्रांक हातोहात बाहेर काढून त्याची सफाईदारपणे उपयोजीत विल्हेवाट लावण्याची यंञणा उभी केली.या यंञणेत कोण कोण सामिल होते ती  नावे प्रकरण उघड होत असतांना संशयित म्हणून चर्चेतही आली.माञ त्यानंतर बेपत्ता झाली.काही दिवसानंतर या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील छपाई कारखान्यातील भंगारात  निघालेले मुद्रांक छपाई यंञ तेलगीला मिळाले.ते कुठून मिळाले? तर सध्या नाशिकमध्ये वादग्रस्त ठरलेल्या अंबड सातपूर लिंकरोड वरील भंगार बाजारापर्यंत या स्क्रप मशीनच्या  व्यवहाराची लिंक पोहचते.तत्कालीन माध्यमांनी या विषयावर प्रकाश टाकतांना या भंगार छपाई यंञाच्या व्यवहारात महाराष्ट्रातील एका थोर समाजवादी विचारसरणीच्या नेत्याचाही  संबंध असल्याचा संशय तपास यंञणेला आहे असे वृत्त प्रसिध्द केले होते.इतकेच नाही तर इंडीया सिक्यूरीटी प्रेस मध्ये काम करणारा एक स्विपर तेलगीच्या संपर्कात होता,हे त्याच्या  तेंव्हा अंदाजे एक कोटी च्या बंगल्याकडे बोट दाखवून माध्यमे सांगत होती.
मुद्रांक छपाईसोबत तेलगीने बनावट चलन छपाईचा गोरख धंदाही सुरू केल्याची चर्चा होती.हा घोटाळा उघड होण्याआधी नाशिकरोडहून छपाई झालेले चलन चोरी होण्याचे प्रकार  घडले आहेत.त्याच्याशी तेलगीचे प्रत्यक्षअप्रत्यक्ष संबंध होते की नाही यावरही प्रकाशझोत टाकला गेला नाही.याच काळात भारत पाक सीमेवर बनावट चलन पकडले गेले.हे चलन  पाकीस्तान मध्ये छापले गेल्याची तेंव्हा चर्चा होती.ते एव्हढे हुबेहुब होते की आपल्या तत्कालीन यंञणेला ते चलन आपल्या चलनात सामाविष्ट करून घेण्याशिवाय अन्य पर्याय उरला  नव्हता आणि त्या चलनाशी तेलगीचे संबंध होते अशी चर्चाही मधल्या काळात सुरू होती.
हे सारे झाल्यानंतर घोटाळ्याची तिव्रता अर्थव्यवस्थेच्या मुळावर आल्यानंतर,आपल्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वाला तेलगीच्या समांतर अर्थव्यवस्थेने आव्हान दिल्यानंतर सांगीतले  जाते त्याप्रमाणे देशाची यंञणा खडबडून जागी झाली.याचाच दुसरा अर्थ तेलगी आपला कारभार करीत असतांना ,तेलगीची पिलावळ आपले पाय देशभर पसरीत असतांना ही यंञणा  गाढ झोपली होती,झोपेचे ढोंग करीत होती किंवा या यंञणेचा एक मोठा हिस्सा तेलगीसोबत कार्यरत होता.
प्रत्यक्ष तपास सुरू असतांना घडलेले सारे रामायण देशाला ज्ञात आहे.त्यावर भाष्य करण्यात कुठलेच हशील नाही,त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.पण आपण स्वीकारलेली लोक शाही आणि तिला अधीन राहून सुरू असलेला हा सारा कारभार पाहील्या नंतर स्वतंञ भारताला हा शाप तर नाही ना? असा प्रश्‍न सहज पडतो.
तेलगी कांडाचा तपास  पुर्ण झाला.तेलगीला शिक्षा ही मिळाली.अर्थात काही खटले न्यायप्रविष्ठ आहेत.तेलगी माञ मेला.सोबत देशाचे झालेले नुकसान भरून काढता येईल असे कायदे  निर्माण करता येतील का? प्रचंड मोठी व्याप्ती असलेल्या अशा घोटाळ्यांमध्ये दोषी म्हणून जबाबदारी निश्‍चित करतांना ठेवलेल्या पळवाटा नेस्तनाबूत होणार नाहीत का? या प्रश्‍नांची  उत्तरे शोधण्याची जबाबदारी आपल्यावर लाडसाब अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत.जोपर्यंत या प्रश्‍नांची उत्तरे आपण शोनून त्याची अंमलबजावणी करीत नाहीत तोपर्यंत या देशाच्या  सात पिढ्यांमध्ये लाडसाब वारंवार पुनःर्जन्म घेण्याच्या मोहापासून स्वतःला रोखू शकणार नाहीत.