Breaking News

संगमनेरमध्ये वीज वितरणच्या विरोधात काँग्रेसच्या रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर, दि. 28, ऑक्टोबर - महावितरण वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक बंद केलेल्या रोहित्रांमुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील सुमारे  पाच हजार शेतक-यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराविरुध्द भव्य रास्ता रोको केला. काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या या  आंदोलनाला तालुक्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र  होते. या आंदोलनामुळे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसत होते.
संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडगांव फाटा येथे झालेल्या या भव्य रास्ता रोको वेळी कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, राजहंस दुध संघाचे  अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ आसह पाच हजार नागरिक उपस्थित होते. वडगाव फाटा येथे सुमारे 2 तास झालेल्या या आंदोलनामुळे  सर्व रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात अनेक शेतकरी वीज वितरणच्या अधिका-यांविरुध्द खूपच आक्रमक झाले होते. यावेळी  अधिका-यांच्या मनमानी विरुध्द आवाज उठवितांना अधिका-यांनी माफी मागावी, यासाठी शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतक-यांना नियंत्रित करतांना प्रशासनाची मोठी  तारांबळ उडाली.
अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले की, शेतक-यांचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक एकवटले आहे. या भव्य  आंदोलनाची मुंबई मधील सरकारला दखल घ्यावीच लागेल. सध्याचे भाजपा सरकार हे नियोजन शून्य सरकार आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. मात्र त्याला  जाणीवपूर्वक उपाशी ठेवले जात आहे. कर्जमाफीने सर्वांना फसविले. शेती मालाला भाव नाही. एकीकडे कारखानदार, उद्योगपती यांना हजारो कोटींचे अनुदान देत आहे.  सर्वांना अन्नधान्य पुरविणा-या शेतक-याला का नाही, जपानमध्ये शेतक-यांना हिरवाई निर्माण करतो म्हणून मोठी मदत करतात. शासनकर्ते हो तुम्हाला स्वच्छ हवा व  ऑक्सिजन पुरविणारा हाच शेतकरी आहे. त्याला संपूर्ण वीज बिल माफी झालीच पाहिजे.