Breaking News

दोषी आढळल्यास किटनाशक कंपन्यांवर फौजदारी गुन्हा - राज्यमंत्री सदाभाऊ खोत

नागपूर, दि. 05, ऑक्टोबर - विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणीकरताना झालेल्या प्रादुर्भावामुळे 18 शेतकरी मृत्युमुखी पडले त तर गंभीर  आजारी झालेल्या 450 जणांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागलेत. याप्रकरणी चौकशी करून त्यात दोषी या आढळणार्‍या कीटकनाशक कंपन्या व कृषी केंद्र चालकांवर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज, बुधवारी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत  होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते.
फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबियांची सांत्वना करण्यासाठी खोत आज, यवतमाळ दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी आर्णी  तालुक्यातील शेंदुरसणी येथील मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबियांची भेट घेतली . तसेच यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल विषबाधित शेतकर्‍यांची त्यांनी भेट  घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली.
या बैठकीनंतर बोलताना खोत म्हणाले की,विषबाधा प्रकरणी चौकशीसाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन झाली आहे.उपचार करून घरी  परतलेल्या विषबाधितांना रूग्ण कल्याण समितीतून आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.कापसाचे बीजी-2 हे वाण  कीडींना बळी पडत असल्याने त्याला केवळ संकरित वाण म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. यामुळे बीजाच्या किंमती कमी होतील.  तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात कृषी ग्राम समिती स्थापन केली जाईल. फवारणीमुळे विषबाधा होणे हा कृषी विभागाच्या अखत्यारीतील विषय असल्याचे त्यांनी  सांगितले. तसेच गेल्या अडीच महिन्यांपासू विषबाधेच्या घटना सुरू असून आरोग्य विभागाने याची माहिती दिली नाही. त्याचप्रमाणे संबधित इतर विभागांनीही माहिती  का दिली नाही याच्या चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान यवतमाळ दौर्‍यादरम्यान सिकंदर शाह नामक  इसमाने खोत यांच्यावर किटनाशक फवारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले.