Breaking News

धायरीतील घटना दुर्दैवी व धक्कादायक - डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे, दि. 23, ऑक्टोबर - धायरी येथे कुदळेमळ्यात अडीच वर्षांच्या बालिकेवर मुलीवर अज्ञात इसमाने अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक  आहे. समाजात अनेक विकृती वाढत आहेत. याही घटनेमध्ये एखादा परिचितच दोषी असू शकेल का ? असा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण होत आहे. मात्र, आरोपीला ताबडतोब अटक  होऊन कायदेशीर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पोलीस अधिकारी व डॉक्टर्स यांना भेटले असून हा तपास जलदगतीने करण्याबाबत विनंती केली  असल्याचे आमदार डॉ. नीलम गोर्‍हे सांगितले. डॉ. गोर्‍हे यांनी या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर  (रविवार) ससूनच्या शवविच्छेदन विभागाजवळ या मुलीच्या नातेवाइकांशी संवाद साधून  त्यांचे सांत्वन केले. या घटनेचा पोलीस तपास योग्य तर्‍हेने व जलद गतीने होण्यासाठी पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली. सदर नातेवाईक भीतीने  गांगरून गेले असून अचानकपणे घडलेल्या या घटनेने अस्वस्थ झाले आहेत.या घटनेबाबत पोलीस अधिकारी व ससून रुग्णालयाचे डॉक्टर्स यांची भेट घेतली. या मुलीच्या कु टुंबीयांवर ओढवलेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी असून तिच्या शवविच्छेदन अहवालावर पुढील गोष्टी अवलंबून असल्याने हा अहवाल विशेष काळजीपूर्वक तयार करण्यात यावा अशी अपेक्षा  त्यांनी व्यक्त केली. शहरी भागात बीट स्तरावर महिला दक्षता व नागरिक सुरक्षा दले स्थापन करणे अत्यावश्यक आहे. या दलांच्या मदतीने दुर्गम व निर्जन भागात अधिकाधिक लक्ष  देण्याची आवश्यकता आहे. बर्‍याचदा लहान मुला - मुलींच्या बाबत घडणार्‍या अशा घटनांमध्ये जवळच्या परिचितांमधीलच कोणीतरी आरोपी असण्याची शक्यता असते.या  पार्श्‍वभूमीवर या घटनेचा पोलीस तपासाबत माहिती घेण्याच्या उद्देशाने डॉ. गोर्‍हे यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर आणि पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशीही  चर्चा केली. या घटनेतील काही संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे. या घटनेत उचित कार्यवाहीसाठी पंच नेमण्यात आले आहेत. अनेक  साक्षीपुरावे गोळा करण्यात येत आहेत. डीएनए तपासण्या करण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. या सर्व मुलभूत बाबींच्या आधारे लवकरात लवकर आरोपींना ताब्यात  घेण्याच्या दिशेने पोलीस तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी आ. डॉ. गोर्‍हे यांना दिली.