Breaking News

मयती आणि दहावे करून विकास करता येत नाही- माजी आ. तनपुरे

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - लोकप्रतिनिधींचे काम हे तालुक्यातील जनतेचे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, शिक्षण, आरोग्य व रस्ते यांचा विकास करणे हे असते. स्थानिक पातळीवर सदर कामे होत नसतील तर विधानसभेत भांडण करून तालुक्यातील प्रश्‍न मार्गी लावणे, यासाठी लोकप्रतिनिधीने आमदारकी पणाला लावण्याची गरज असते. नुसते सभा मंडप करून आणि मयती, दहावे करून तालुक्याचा विकास करता येत नाही, असा टोला राहुरीचे माजी आ. प्रसाद तनपुरे यांनी आ. शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळून लगावला.    तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ऋषीकेष मोरे होते. विधानसभेत गेली 25 वर्षे मूग गिळून गप्प बसणार्या आमदार शिवाजी कर्डीले यांनी राहुरी मतदार संघाची केलेली दयनीय अवस्था यावर भाष्य करत तनपुरे पिता पुत्रांनी आ. शिवाजी कर्डीले यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.
प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे म्हणाले, की तालुक्यातील शेतकरी कारखान्यांवर जो विश्‍वास ठेवत आहेत, त्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. नगर जिल्ह्यातील  प्रगतीशील असलेला साखर कारखाना ऊसाला जो भाव देईल, त्यांच्या बरोबरीने प्रसाद शुगर भाव देईल. कोणत्याही बाबतीत प्रसाद शुगर कारखाना मागे पडणार नाही. कारखान्याने  6. 50 लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून ते पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी ऊस प्रसाद शुगरला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी प्राजक्त  तनपुरे यांनी केले.
यावेळी रविंद्र आढाव, सुरेश निमसे, संभाजी गडाख, अमोल वाघ व तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसाद तनपूरे व  उषा तनपूरे यांच्या हस्ते  मोळी टाकून प्रसाद शुगरच्या सातव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन कारखान्याचे बबन पागिरे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश वाबळे, राहुरी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र आढाव, सुरेश निमसे, सुरेश बाफना, राहुरी नगर प रिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषा  तनपुरे, विद्यमान उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष पापाभाई बिवाल, विलास गागरे, प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक  सुशीलकुमार देशमुख, जनरल मॅनेजर सुखदेव शेटे आदिंसह तालूक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.