एस.टी. महामंडळाकडून महिलांचा विचार
पुणे, दि. 09, ऑक्टोबर - महिलांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाद्वारे पुणे विभागाच्या स्वारगेट आगारामध्ये असलेल्या महिलांच्या शौचालयात लवकरच सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळताच शौचालयामध्ये सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन बसविण्यात येणार आहेत.स्वारगेट आगारातील स्वच्छतागृहात प्रायोगीक तत्वावर हा प्रयोग करण्यात येणार असून याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास त्यानुसार हा उपक्रम वाढविण्यात येणार आहे. मुख्य कार्यालयाच्या परवानगी नंतरच पुण्यात हा प्रयोग सुरू करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या सुविधेचा प्रसार करण्यात येणार आहे. ही सुविधा कमीत कमी शुल्कात उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा मानस असल्याची माहिती विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली.